नवी मुंबई,
IND vs SA Final : महिला विश्वचषक २०२५ मध्ये नवा इतिहास घडणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी कधीही विश्वचषकाचे विजेतेपद जिंकलेले नाही, त्यामुळे या सामन्यात जगाला एक नवा विश्वविजेता मिळणार आहे.
 
 
 
 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात कांगारूंनी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. फोबी लिचफिल्डच्या (११९ धावा) शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचे मोठे लक्ष्य उभे केले. एलिस पेरी आणि अॅशले गार्डनर यांनीही अर्धशतके ठोकली. परंतु भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या तडाखेबाज खेळीमुळे हे आव्हान सहज पार केले.
 
जेमिमाने १३४ चेंडूत नाबाद १२७ धावा करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. कर्णधार हरमनप्रीत कौरने ८९ धावा तर रिचा घोषने २६ धावा जोडल्या. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने ३३९ धावांचे लक्ष्य गाठत विश्वचषकाच्या इतिहासात नवा विक्रम रचला.
  
दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा १२५ धावांनी दणदणीत पराभव केला. लॉरा वोल्वार्डने १६९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि आपल्या संघाला पहिल्यांदाच विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचवले.
 
आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारत आणि लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांपैकी जो संघ विजयी होईल, तो महिला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवेल.