आता ट्रेंड स्नॅक्स टूरिझमचा !

snacks tourism-gen z ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा ट्रेंड सेटर ठरणार

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
वेध
 
: रेवती जोशी-अंधारे
9850339240
snacks tourism-gen z ‘नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे’ समर्थ रामदास स्वामींची ही उक्ती आजचे मिलेनियल्स आणि जेन झी खऱ्या अर्थाने सार्थ ठरवित आहेत. देशविदेशात फिरून मनुष्याला येणारा विवेक, त्याला सुजाण बनवितो, ही मान्यता! पर्यटन कशासाठी तर शिक्षणासाठी, निसर्गसौंदर्यासाठी, प्राचीन वास्तूंच्या अभ्यासासाठी, आरामासाठी आणि क्वचित वैद्यकीय उपचारांसाठी सुद्धा! पण, आता ठिकठिकाणचे स्नॅक्स खाण्यासाठी पर्यटनाचा ट्रेंड आला आहे. ‘फिरायला जाणे’ यामागची संकल्पनाच बदलून गेली आहे. प्रत्येक 10 मैलांवर भाषा बदलते तशी खाद्य संस्कृतीही बदलते. फिरायला गेल्यानंतर एखाद दुसरा स्थानिक पदार्थ चाखायचा, ही रूढी मोडीत काढून, कुठे आणि काय चांगलं खायला मिळते? तिथे फिरायला जायचा ट्रेंड आहे. सोशल मिडीयावर व्हायरल रिल्स, स्नॅक्स बनवितानाचे किंवा त्यांचे अन बॉक्सिंग करतानाचे व्हिडीओज् कल्पनेपलिकडे लोकप्रिय आहेत.
 
 

snacks tourism-gen z
 
(फोटो इंटरनेटवरून साभार)
 
snacks tourism-gen z एका ताज्या आकडेवारीनुसार, परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी 47 टक्के पर्यटक, स्थानिक पेय-पदार्थ आणि स्नॅक्सच्या पर्यायांचा प्राधान्याने विचार करतात. त्यात स्वित्झर्लंडचे चॉकलेट बुटीक, जपानचे किटकॅट, कोरियाई हनी बटर चिप्स, इटालियन ट्रफल क्रिस्प्स, थायलॅण्डचे प्रिंगल्स, तायवानचा बबल टी, टोकियोतील विविध चवींचे सकुरा, सेऊलच्या पेस्ट्री, दुबईचे कुनाफा चॉकलेट, फ्रूट आईस्क्रीम अशी ही यादी न संपणारी आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर काय बघायचं? तिथली वनराई, जंगल सफारी, संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू, प्राणी संग्रहालय, गगनचुंबी इमारती आणि तारांकीत हॉटेल्स? नाही! एखाद्या लहानशा गल्लीत मिचमिच्या डोळ्यांच्या आजीबाईने बनवलेली पेस्ट्री, रस्त्याच्या कडेला उभ्या हातगाडीवर बनविलेला पास्ता, एखाद्या सुपर मार्केटमध्ये मिळणारी स्थानिक फळांपासून बनविलेला खमंग चवीचा एखादा पदार्थ हे नव्या काळातील ‘ट्रॅव्हल गोल’ आहे. एखाद्या चॉकलेट किंवा विशिष्ट सॅण्डविचसाठी परदेश प्रवास करण्यासाठी तयार असलेली आताची पिढी, खाण्याच्या अनुभवातून त्या ठिकाणच्या संस्कृतीशी जोडली जाण्यास उत्सुक आहे. ही खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटूंबकम्’ची सुरुवात आहे.
 
 
 
snacks tourism-gen z देशोदेशीच्या प्रस्थापित पर्यटनस्थळांऐवजी स्थानिक खाद्यपदार्थ आता टुरिस्ट डेस्टिनेशन ‘ठरवत’ आहेत. यामध्ये जेन झीसोबतच मिलेनियल्स म्हणजे गेल्या शतकातील 80च्या दशकात जन्मलेली मंडळीसुद्धा पुढे आहेत. दहापैकी 6 पर्यटक स्थानिक व्यंजनांच्या माहितीवर, त्या पर्यटन स्थळी जायचं किंवा नाही, हे ठरवितात. जवळपास 70 टक्के पर्यटक असे खास पदार्थ विकत घेण्यासाठी वेगळं बजेटसुद्धा प्लॅन करतात. जास्त शेल्फ लाईफ असलेले पदार्थ विकत घेऊन, मायदेशी भेट म्हणून देण्याकडेही पर्यटकांचा कल वाढला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या हातगाड्यांप्रमाणेच, स्थानिक सुपरमार्केट किंवा लहान खाणावळींनाही पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. ‘बिल्डींग बघण्यापेक्षा बर्गर महत्त्वाचा’ असा ट्रॅव्हल फंडा आहे. पॅरीसमध्ये जाऊन आयफेल टॉवर बघितला नाही तर काय बघितलं? हे मानणारी पिढी आता संपतेय. एकूण जेन झी पर्यटकांपैकी 38 टक्के, आयफेल टॉवर बघण्यापेक्षा, खास आणि अस्सल चवीचे फ्रेंच पदार्थ खायला प्राधान्य देतात.
 
 
 
snacks tourism-gen z व्हायरल व्हिडीओज बघून, त्या ठिकाणी पोहचलेले हे पर्यटक त्या स्नॅक्ससाठी अगदी रांगा लावून उभे राहतात. महागडी हॉटेल्स आणि तिथलं जेवण पर्यटकांच्या पसंतीक्रमातून हद्दपार झालं आहे. दक्षिण आशियातील गल्लीबोळात ‘7 इलेव्हन’ नावाची स्थानिक खाणावळ शोधत भटकणाऱ्या आणि दुबईच्या कुनाफाची चव सांगताना न थकणाऱ्या ‘हिस्टेरिक’ पर्यटकांचे व्हिडीओज एका क्लिकवर आहेत. पर्यटनाचे निमित्त आता निसर्गसौंदर्याची विहंगम दृश्ये नसून, देशी चवीचे पदार्थ झाले आहेत. सोशल मिडीयावरील व्हायरल व्हिडीओजमुळे ही क्रेझ निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं मत असलं तरी पर्यटकांच्या मनापर्यंतचा मार्गही आता त्यांच्या पोटातून जातो, ही नवी संकल्पना मूळ धरते आहे. येणाऱ्या दशकात ‘स्नॅक टुरिझम’ हा ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा ट्रेंड सेटर ठरणार आहे.