मुंबई,
Actress Sandhya Shantaram passes away मराठी चित्रपटसृष्टीवर गहिरी शोककळा पसरली आहे. ‘पिंजरा’, ‘नवरंग’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ सारख्या क्लासिक चित्रपटांमधून आपल्या मोहक व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम नृत्यकलेने रसिकांच्या मनात अमिट ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिलं, भावपूर्ण श्रद्धांजली! ‘पिंजरा’ चित्रपटातील ख्यातनाम अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषतः ‘पिंजरा’मधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

संध्या शांताराम मूळ नाव विजया देशमुख. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ या १९५९ मधील चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा आणि नृत्यकौशल्याचा अद्वितीय ठसा उमटवला. “अरे जा रे हट नटखट” हे गाणं आजही त्यांच्या कारकिर्दीचं प्रतीक मानलं जातं. या गाण्यासाठी त्यांनी शास्त्रीय नृत्याचं खास प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्या काळात कोणताही नृत्यदिग्दर्शक नसल्याने गाण्यातील सर्व स्टेप्स संध्या आणि व्ही. शांताराम यांनी स्वतः तयार केल्या होत्या. या गाण्याच्या चित्रिकरणावेळी शांताराम यांनी सेटवर खरे हत्ती आणि घोडे आणले होते. त्या वातावरणात नृत्य करणे अत्यंत धोकादायक असतानाही संध्या यांनी निर्भयपणे परफॉर्म केला. त्यांनी बॉडी डबल वापरण्यास नकार देत स्वतः त्या प्राण्यांशी मैत्री केली, त्यांना स्वतःच्या हातांनी केळी-नारळ खाऊ घातले आणि पाणी दिले. त्यांच्या या धाडसाने आणि समर्पणाने व्ही. शांताराम भारावून गेले.
त्यानंतर संध्या शांताराम यांनी ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘अमर भूपाळी’ आणि ‘पिंजरा’ यांसारख्या नामांकित चित्रपटांमध्ये अभिनय करून भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं अजरामर स्थान निर्माण केलं. त्यांचं आणि व्ही. शांताराम यांचं कलात्मक सहकार्य मराठी सिनेमाच्या इतिहासात एक सुवर्ण पर्व म्हणून कायम स्मरणात राहील. संध्या शांताराम यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने एक विलक्षण अभिनेत्री, एक नृत्यांगना आणि एक समर्पित कलाकार गमावला आहे.