बाभुळगाव तालुक्यात बीएसएनएल सेवा कोलमडली

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
babhulgaon-bsnl : भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकांना अनियमित सेवेचा चांगलाच फटका बसत आहे. अनेकांनी माफक रिचार्ज दर असल्याकारणाने आपले मोबाईल क्रमांक बीएसएनएलमध्ये पोर्ट करून घेतले. काहींनी नवीन नंबर विकत घेतले. मात्र सरकारची सर्वात मोठी कंपनी असलेल्या बीएसएनएलची बाभुळगाव तालुक्यातील इंटरनेट व मोबाईल कॉलिंगची सेवा गेल्या 20 दिवसांपासून ठप्प झाली आहे. कंपनीची सेवा कोलमडल्याने ग्राहक त्रस्त झाले असून अजूनही बीएसएनएलने धोरणात बदल न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
 

bsnl 
 
मागील 20 दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद असून आता त्यात मोबाईल कॉलिंग सेवा खंडित होत असल्याने ग्राहक चांगलेच त्रस्त झाले आहेत. काही लोकांकडे बीएसएनएलचे एकच सीमकार्ड असल्याने त्यांना रोजचे व्यवहार करणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. काही ग्राहकांनी ग्राहकसेवा केंद्राच्या टोलफ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली असता दोन दिवसांत सेवा सुरळीत सुरू होईल, असे मेसेज देण्यात आले. मात्र अद्यापही या कंपनीची इंटरनेट व इतर सेवा सुविधा सुरळीत सुरू झाली नाही.
 
 
 
तालुक्याच्या ठिकाणी असलेले कंपनीचे कार्यालय काही वर्षांपूर्वीच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या समस्या ऐकण्यासाठी इथे कुणीही अधिकारी उपलब्ध नाही. याच कारणांमुळे भरमसाठ महाग रिचार्ज असलेल्या इतर खाजगी कंपनींकडे ग्राहक वळत असून सरकारची मोठी कंपनी असलेल्या बीएसएनएलकडे ग्राहकांचा कल कमी झाल्याचे दिसत आहे. ग्राहकांची ओरड होणे स्वाभाविक असून बीएसएनएल कंपनीने आपली मोबाईल सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.