भीमस्मृती विरुद्ध लालकृती

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
constitution राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे विजयादशमी उत्सव संपन्न झाला. या सोहळ्यात संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेले मार्गदर्शन आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण हे देशाच्या भविष्याशी निगडित मुद्यांवर प्रकाश टाकणारे ठरले. कोविंद यांनी अटलबिहारी वाजपेयींचे एक ऐतिहासिक वाक्य उद्धृत केले, ज्यात वाजपेयी म्हणाले होते, ‘आमचा पक्ष मनुस्मृतीनुसार नव्हे तर भीमस्मृतीनुसार चालतो ’ त्या काळी भाजपा आणि संघावर दलित विरोधी असल्याची टीका व्हायची. म्हणूनच वाजपेयी यांनी संविधानाला भीमस्मृती असे संबोधले आणि आपण संविधानानुसार वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट केले. भीमस्मृतीनुसार वाटचाल करणे म्हणजे समता, न्याय आणि बंधुभावाच्या मार्गावरून मार्गक्रमण करणे होय. आज राहुल गांधी आणि त्यांची स्वयंघोषित पुरोगामी लाल-गँग संविधान वाचवण्याचा दावा करतात. स्वातंत्र्यपूर्व काळातही काँग्रेस व त्यांच्या गँगने संघ, सावरकर इत्यादी राष्ट्रभक्त संघटना व व्यक्तींची बदनामी चालवली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही बदनामी म्हणजेच निवडणुकीत मते मिळवण्याची फॅक्टरी झाली. महापुरुषांची व संघाची बदनामी करून हे घटक संविधानविरोधी आहेत असे दाखवून लोकांची मते यांनी लुबाडली.
 
 

संविधान  
 
 
त्या काळी माहितीचे स्रोत फारच कमी होते. सोशल मीडिया नव्हता, प्रसारमाध्यमे मजबूत नव्हती. आणिबाणीमध्ये कित्येक लोकांचा आवाज दाबण्यात आला. अनेकांना तुरुंगात धाडले, छळ केला. शीख दंगल, गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांना दिलेला त्रास, टुलकिट, देशविघातक आंदोलने, सीएएवरून झालेली दंगल, शाहिनबाग यांस प्रोत्साहन आणि पाठिंबा या सर्व गोष्टी स्वत:ला बळजबरीने गांधीवादी म्हणवणाऱ्या लाल- गँगने केल्या आहेत. इतके करूनही हे स्वतःला संविधानप्रेमी म्हणवून घेतात हे विशेष.
वाजपेयींच्या मते, मनुस्मृतीसारख्या प्राचीन ग्रंथांऐवजी भीमस्मृती, म्हणजेच संविधान, हे राष्ट्राचे मार्गदर्शक तत्त्व आहे. हे संविधान सर्व समाजाच्या उत्थानासाठी, एकात्मतेसाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी निर्माण केले गेले आहे. संघासारख्या संघटनांनी नेहमीच या संविधानाचा आदर केला आहे. कोविंद यांनी भाषणात आंबेडकरांचे आभार मानले. मात्र इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे स्वतःला बळजबरीने संविधानाचे रक्षक म्हणवून घेत आहेत, तेच खऱ्या अर्थाने भक्षक आहेत. कारण श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या शेजारच्या राष्ट्रांत जशी हिंसक आंदोलने झाली तशी हिंसक आंदोलने इथेही व्हावीत आणि विद्यमान सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. वेळोवेळी हिंसक आंदोलने करण्याची साध्या भाषेत चेतावनी दिली जात आहे. त्यामुळे संघ प्रभृती संघटना आणि व्यक्ती संविधानाचे रक्षक असून स्वत:स बळजबरीने संविधान रक्षक म्हणवून घेणारी लाल-गँग हीच संविधानाच्या मुळावर उठलेली आहे. म्हणूनच भीमस्मृती विरुद्ध लालकृती असा संघर्ष उभा राहिलेला आहे. डावे विचारवंत, कम्युनिस्ट आणि कथित सेक्युलर गट हे संविधानाच्या मूलभूत भावनेला छेद देतात. त्यांचे हेतू स्पष्ट आहेत, समाजाला जातीय, धार्मिक आणि आर्थिक आधारावर विभागणे, राष्ट्रवादी शक्तींना कमकुवत करणे आणि परकीय शक्तींच्या हितसंबंधांना पाठबळ देणे.
 
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणात देशावर येणाèया धोक्यांचे संकेत मिळतात. त्यांनी शेजारील देशांतील हिंसक क्रांती आणि अस्थिरतेचा उल्लेख केला. बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये जेन झीच्या नेतृत्वाखालील आंदोलने आणि हिंसक घटना घडल्या, ज्यामुळे सरकारे कोसळली आणि अराजकता पसरली. डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, अशा हिंसेने बदल होत नाही; लोकशाही मार्गाने आणि संवैधानिक मार्गानेच स्थिरता आणावी.constitution फ्रान्स क्रांतीसारख्या ऐतिहासिक घटनांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत ते म्हणाले की, अशाप्रकारची क्रांती जरी सुरुवातीला न्यायाची मागणी करत असली तरी ती हिंसेत रूपांतरित होऊन समाजाला विखुरते. डावे आणि सेक्युलर गट हे नेहमीच अशा हिंसक विचारांना प्रोत्साहन देतात. भारतातही ते ‘सेक्युलरिझम’च्या नावाखाली हिंदू एकजुटीला विरोध करतात, ज्यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात येते.
 
हिंदू राष्ट्र हा डॉ. भागवत यांनी सांगितलेली संकल्पना केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक आहे. भारत हे प्राचीन हिंदू राष्ट्र आहे, ज्यात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आहे. हिंदू समाजाची एकजूट ही देशाच्या सुरक्षेची हमी आहे, असे सरसंघचालकांना वाटते. मात्र, लाल-गँग या हिंदू राष्ट्राच्या कल्पनेला ‘सांप्रदायिक’ म्हणून बदनाम करतात. त्यांचे हेतू म्हणजे हिंदू समाजाला कमकुवत करणे आणि त्याआधारे भारतीय मूल्यांचा नाश करून भारताला कम्युनिस्ट किंवा साम्यवादी विचारसरणीने वेढणे, ज्यामुळे संविधानाची पायाभूत रचना धोक्यात येईल. लालकृतीच्या हेतूंचा विचार केला तर, ते संविधानाच्या विरोधात आहेत कारण ते भीमस्मृतीच्या समतेच्या तत्त्वाला मान्यता देत नाहीत. डावे गट नेहमीच वर्गसंघर्षावर भर देतात, ज्यामुळे जातीय आणि धार्मिक विभाजन वाढते. सेक्युलर म्हणवणारे हे लोक खरेतर ‘वोट बँक सेक्युलरिझम’ करतात, ज्यात अल्पसंख्यकांना खुश करण्यासाठी बहुसंख्य हिंदू समाजाच्या हक्कांचे उल्लंघन करतात. या पृष्ठभूमीवर हिंदू संघटनेचे महत्त्व अधोरेखित होते. शेजारील देशांतील अराजकता भारतात घुसू नये यासाठी एकजूट हवी.
 
दसऱ्याच्या दिवशी सीमा ओलांडायचा निश्चय आपण करतो. सीमा म्हणजे केवळ राष्ट्राच्या सीमा नव्हे तर विचारांच्या सीमा ओलांडणे हे सुद्धा गरजेचे आहे. प्राचीन-अर्वाचीन काळी अनेक आक्रमक त्यांच्या देशाच्या सीमा ओलांडून भारतात राज्य करण्यासाठी आले. शक-कुशाण-हूण यासारख्या आक्रमकांचा पराभव करून आपण त्यांना आपल्यात विलीन केले. एलेक्झांडरसारख्या अत्यंत पराक्रमी राजाला आपण भारतातून पराभूत करून पाठवले. छत्रपती शिवरायांनी मुघल आदी आक्रमकांच्या चारी मुंड्या चीत केल्या. शिवरायांनी लढवय्या मराठी माणसाची परंपरा निर्माण केली. पुढे पोर्तुगीज, इंग्रजांनाही आपण नामोहरम करून सोडले. भारतीय क्रांतिकारकांनी स्वबळावर स्वातंत्र्य प्राप्त केले. आज देशावर आलेले संकट हे वेगळे आहे. हे आक्रमक मानवतेचा मुखवटा घालून घुसले आहेत. ते आपल्यासारखेच दिसतात मात्र त्यांचे हेतू खुनशी आहेत. म्हणूनच भीमस्मृतीचे रक्षण करण्यासाठी, लोकशाही, मानवी व भारतीय मूल्ये जपण्यासाठी आपणही प्रभू श्रीरामचंद्रांची सीमोल्लंघनाची परंपरा कायम ठेवून, लालकृतीचा धोका दूर करण्याची प्रतिज्ञा घेऊया...
जयेश शत्रुघ्न मेस्त्री