खड्डा चुकविताना दोन कारचा भीषण अपघात

*बाबा बेकरीच्या संचालकाचा मृत्यू, कवडघाट गावाजवळील घटना

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट,
car-accident-hinganghat : हिंगणघाट येथून वर्धेला कारने जात असताना कवडघाट गावाजवळ खड्डे चुकविताना समोरून येणारी कार येथील बाबा बेकरीचे संचालक शकील अहमद खान यांच्या कारवर धडकली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ३ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
 
 
jlkj
 
 
 
शहरातील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिक शकील अहमद खान (४९) हे एम. एच. २० बी. वाय. ३६२४ क्रमांकाच्या नॅनो कारने वर्धेकडे जात होते. कवडघाटजवळ रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने हे खड्डे चुकविताना समोरून येणारी एम. एच. ३४ बी. व्ही. ७१७५ ही किया कार त्यांच्या कारवर धडकली. या अपघातात बेकरी व्यावसायिक शकील अहमद खान गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ हिंगणघाट येथील लोढा यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शकील यांच्याकडून कुठलीच हालचाल होत नसल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले. तपासणीअंती उपजिल्हा रुग्णालयातील डॉटरांना त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणात हिंगणघाट पोलिसात किया वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शकील यांच्या पार्थिवावर आज स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हिंगणघाट शहरातील व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.