अभिजात मराठी भाषा दिवस हा एक महत्त्वाचा पायंडा: बाबाराव मुसळे

शासकीय जिल्हा ग्रंथालयात भाषा सप्ताहाचे उद्घाटन

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
वाशीम, 
babarao musale केंद्र शासनाने भारतातील एकूण प्रमाणित बावीस भाषांपैकी मराठी या भाषेला ३ ऑटोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा मंजूर केला. यामागे अभिजात मराठी भाषा समितीची मेहनत आणि चिवटपणा सर्वाधिक मोलाचा आहे. त्याचेच फल़ीत म्हणून आज अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्याचा एक महत्त्वाचा पायंडा पडतो आहे, असे भाष्य सुविख्यात ग्रामीण कथा-कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी केले. शासकीय जिल्हा ग्रंथालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
 
 

मराठी भाषा  
 
 
अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य तथा अमरावती विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना मुसळे म्हणाले, की मराठी ही अभिजात भाषाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी समितीने अतिशय मेहनत घेतली. त्यासाठी अनेक जुन्या पोथ्या, हस्तलिखिते, ताम्रपट आणि अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचा अभ्यास केला. साधारणतः दुसर्‍या शतकापासूनचे अनेक पुरावे या समितीने समोर ठेवले. त्यासाठी एक उदाहरण असे देता येईल की, समितीने अनेक जुन्या पोथ्यांमधून जवळपास सात लाख असे शब्द निवडले की ज्यामुळे मराठी ही भाषा अभिजात भाषाच आहे, हे सिद्ध करण्यास मोलाची मदत झाली. यासाठी समितीची मेहनत आणि चिवटपणा फळाला आला, असे मुसळे यांनी सांगितले.
प्रारंभी, अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील आणि बाबाराव मुसळे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झाले. हे प्रदर्शन सप्ताहभर राहणार असून, जिल्हाभरातील वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी अभिजात मराठी भाषा दिवसाच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन सप्ताहभर होणार्‍या कार्यक्रमांमध्ये साहित्यिक, अभ्यासकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.babarao musale हा सप्ताह कसा साजरा करायचा, याबाबत मार्गदर्शक सूचनाही केल्या. शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी प्रास्ताविकातून सप्ताहात होणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रंथालय परिषदेवर ग्रंथमित्र प्रभाकर घुगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल बळी यांनी केले. तांत्रिक सहाय्यक नरेश काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील साहित्यिक तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.