वाशीम,
dattatreya bharane शासकीय सेवेत रुजू होत असताना नागरिकाभिमुख, जबाबदार आणि कार्यक्षम अशा भावनेने कार्य करा. शासनाने निर्माण केलेल्या संधींचा उपयोग समाजहितासाठी करा आणि आपल्या कार्यातून प्रशासनात मौल्यान्वित योगदान द्यावे. असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. व्यासपीठावर विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहाण, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी, आत्माराम बोंद्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार ४९ उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ४६ उमेदवारांच्या नियुक्तीपत्र वितरणाचा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा ४ ऑटोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम (नियोजन भवन समिती सभागृह) येथे आयोजित करण्यात आला. यावेळी राज्याचे कृषीमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे दूरदृष्यप्रणालीव्दारे बोलत होते.यावेळी त्यांनी नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले, शासनाच्या सर्वसमावेशक अनुकंपा भरती धोरणाच्या अंमलबजावणीमुळे वाशीम जिल्ह्यात आज एकाचवेळी ९७ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये अनुकंपा भरतीअंतर्गत ४९ उमेदवार व एमपीएससी तर्फे निवड झालेल्या ४८ उमेदवारांचा समावेश आहे. १७ जुलै २०२५ रोजी शासनाने जारी केलेल्या नवीन अनुकंपा भरती शासन निर्णयामुळे विविध विभागांतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीची प्रक्रिया गतीमान झाली आहे. पूर्वी रिक्त पदांचा अभाव व विभागीय समन्वय नसल्याने उमेदवारांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती. आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सर्व विभागांकडील रिक्त पदांची एकत्रित माहिती घेऊन समुपदेशनाद्वारे उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार नियुक्ती देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वाशीम जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये २० राज्य शासनाचे, २० जिल्हा परिषदेचे व ९ पोलिस विभागातील अशा ४९ उमेदवारांना अनुकंपा भरतीतून नियुक्ती दिली जात आहे. त्याचबरोबर एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक भरतीअंतर्गत ४८ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या शासन निर्णयामुळे गट-ड पदांसाठीची २० टक्के मर्यादा शिथिल करण्यात आल्याने गट-ड वेटिंग लिस्टमधील उमेदवारांनाही संधी मिळाली आहे.
आ. खोडे म्हणाले की, जेव्हा एखाद्या कर्मचार्याच्या कुटुंबावर अचानक संकट येते आणि त्या कुटुंबाची परिस्थिती बिकट होते, तेव्हा शासनाकडून त्यांच्या मनात अपेक्षा असते की त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या जागेवर कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळावी. अशा अनेक कुटुंबांच्या आशा वर्षानुवर्ष शासनाच्या कार्यालयात चकरा मारत राहिल्या. काही वेळा तर असेही घडले की, संबंधित कर्मचारी कुटुंबातील सदस्य त्या प्रतीक्षेतच हयात राहिले नाहीत.dattatreya bharane शासनाने या सर्व बाबी गांभीर्याने घेतल्या आणि कर्मचार्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा हा निर्णय म्हणजे कर्मचार्यांच्या कुटुंबासाठी खरा आधार आहे. भविष्यात जर अशा दुर्दैवी घटना घडल्या तर त्या कुटुंबांना आता जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, ही दिलासादायक बाब आहे, असे ते म्हणाले. यावेळी उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मेळाव्याला लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक, पालक, विविध विभागाचे नियुक्ती प्राधिकारी, अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.संचालन शाहू भगत यांनी केले. आभार आरडीसी विश्वनाथ घुगे यांनी मानले.