गाझामध्ये शांततेकडे निर्णायक पाऊल; मोदींनी केले ट्रम्प यांचे कौतुक

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Modi praised Trump दोन वर्षांच्या रक्तरंजित संघर्षानंतर गाझामध्ये अखेर शांततेची किरणे दिसू लागली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने तयार झालेल्या शांतता योजनेत हमासने अनेक महत्त्वाच्या अटी मान्य केल्या असून, इस्रायलनेही गाझावरील हल्ले थांबवण्याचे संकेत दिले आहेत. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत नव्या शांततेच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे दिसते. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णायक घडामोडींचे स्वागत करत ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या निर्णायक प्रगतीसाठी आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे स्वागत करतो. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारत कायमस्वरूपी आणि न्याय्य शांततेच्या दिशेने सर्व प्रयत्नांना जोरदार पाठिंबा देत राहील.
 
 

Modi praised Trump 
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-हमास युद्ध समाप्त करण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी एक व्यापक शांतता योजना मांडली होती. या योजनेनुसार, हमास ओलिसांना मुक्त करेल आणि गाझा प्रशासनातील काही जबाबदाऱ्या पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्या जातील. हमासने या योजनेतील काही बाबींना मान्यता दिली असली तरी काही मुद्द्यांवर अजूनही अंतर्गत चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी हमासच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत सोशल मीडियावर लिहिले की, मला वाटते की हमास आता दीर्घकालीन शांततेसाठी तयार आहे. इस्रायलने तातडीने गाझावरील बॉम्बहल्ले थांबवावेत, जेणेकरून ओलिसांची सुरक्षित सुटका होऊ शकेल. या टप्प्यावर हल्ले सुरू ठेवणे धोकादायक ठरेल.
 
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही संकेत दिले की, इस्रायल ट्रम्प यांच्या प्रस्तावित शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहे. त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल युद्ध संपवण्यासाठी आणि गाझामध्ये स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांच्या तत्वांनुसार पुढे जाण्यास बांधील आहे. या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील दीर्घकाळ चालत आलेल्या तणावाला अखेर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. भारताने या प्रक्रियेला दिलेला स्पष्ट पाठिंबा जागतिक शांततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.