सव्वा महिन्यात बेशिस्त वाहनचालकांवर 7.76 लाखाचा दंड

एएनपीआर कॅमेराची कमाल; पोलिस विभागाच्या महसूलात भर

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
रवींद्र तुरकर
गोंदिया,
police department revenue बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूक अपघात विरहीत, सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील अतिवर्दळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एआय आधारीत एएनपीआर कॅमेरा बसविण्यात आला. सव्वा महिन्याच्या कालावधीत वाहतूक नियम मोडणार्‍या 1110 वाहनचालकांना चलान जारी करून त्यांच्यावर 7 लाख 76 हजार 500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या वाहन चालकांनी वारंवार नियम मोडल्यास त्रूांचा वाहतुक परवाना रद्दही केला जाऊ शकतो.
 

police 
 
 
शहरातील वाढती लोकसंख्या, वाहन संख्या पाहता दिवसेंदिवस शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. वाहनचालक वाहतूक नियमांना बगल देत असल्याचे चित्र शहरातील चौकाचौकात, रस्त्यांवर पहावयास मिळते. अनेकदा चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना न जुमानता सिग्नल मोडून हे वाहनचालक सुसाट जाताना दिसतात. परिणामी अपघाताच्या घटना घडतात. अशा मुजोर वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस विभागाने शहरातील वर्दळीचे प्रमुख चौक, मुख्य रस्त्यांवर कृत्रिम तंत्रज्ञान (एआय) आधारीत 16 एएनपीआर कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑगस्ट रोजी एएनपीआर कॅमेर्‍याच्या नियंत्रण कक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. शहरातील केंद्रस्थानी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एएनपीआर कॅमेरा बसविल्यानंतर 3 ऑक्टोबरपर्यंत 1110 बेशिस्त वाहनचालकांना नियम भंग करण्यासाठी चालान जारी करण्यात आले आहे.police department revenue या चालकांवर विरूद्ध दिशेने व ट्रिपल सीट वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे आदी कारणांसाठी 7 लाख 76 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पैकी आतापर्यंत 33 वाहनचालकांनी 21 हजार रुपयाचा दंड भरल्याची माहिती जिल्हा वाहतुक शाखेने दिली.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (एएनपीआर) हे एक अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान वापरून नंबर प्लेट्स स्कॅन करून वाहन कोणाच्या नावे आहे हे ओळखता येते. हे कॅमेरे रस्त्यावर वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. एखादा चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार किंवा चुकीच्या बाजूने वाहन चालविणार, तेव्हा कॅमेरा त्याचे वाहन आणि नंबर प्लेट स्कॅन करतो. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची माहिती आणि फोटो या कॅमेर्‍याद्वारे गोळा करून, वाहनधारकाला ऑनलाइन ई-चालान पाठवले जाते. यामुळे नियम मोडणार्‍यांवर त्वरित कारवाई करणे शक्य झाले आहे.
वाहनचालकांनो वाहतुक नियमांचे पालन करा - नागेश भास्कर
वाहन चालकांना शिस्त लागावी, त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, चुकीच्या बाजूने वाहन टाकल्यास वाहनचालक स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालतात, अपघाताच्या घटना घडतात, नियमांचे उल्लंघन केल्यास प्रथम 500, दुसर्‍यांदा 1,500 रुपये दंड आकारण्यात येणार, तिसर्‍यांदा नियम मोडल्यास न्यायालयाकडून समंस जारी करू, वारंवार नियम मोडल्यास वाहन परवाना रद्द करण्यात येईल. म्हणून वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक नागेश भास्कर यांनी केले आहे.