सरसंघचालकांचे शताब्दी उद्बोधन

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
दिल्ली अग्रलेख
dr mohanji bhagwat रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवात परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत काय बोलतात, याकडे फक्त संघाच्या स्वयंसेवकांचे आणि संघावर प्रेम करणाऱ्यांचेच नाही तर संघाच्या विरोधकांचे म्हणजे संघाचा पराकोटीचा द्वेष करणाऱ्यांचेही लक्ष लागले होते. यावेळचा विजयादशमी उत्सव संघासाठी अभूतपूर्व असा म्हणावा लागेल. कारण हा संघाचा 100 वर्ष पूर्ण झालेला शताब्दी उत्सव होता. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांसाठी तसेच संघावर प्रेम करणाऱ्यांसाठी या उत्सवाचे अनन्यसाधारण असे महत्त्व होते.
 
 


मोहनजी 
 
 
1925 ला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्यांनी त्यावेळी लावलेल्या संघरूपी रोपट्याचा आज विशाल असा वटवृक्ष झाला आहे. संघाची स्थापना तिथीप्रमाणे विजयादशमी तर इंग्रजी तारखेप्रमाणे 27 सप्टेंबर. त्यामुळे संघ आपला स्थापनादिवस उत्सव तारखेप्रमाणे नाही तर तिथीप्रमाणे दरवर्षी विजयादशमीला साजरा करतो. शताब्दीनिमित्त यावेळी प्रथमच संघाने 27 सप्टेंबरला नागपुरात तीन पथसंचलने काढली. या तिन्ही पथसंचलनाचा त्रिवेणी संगम व्हेरायटी चौकात झाला. प्रयागराजला जसा गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र अशा त्रिवेणी संगमाचे देशभरातील हिंदूना आकर्षण असते, तसेच यावेळी व्हेरायटी चौकातील या पथसंचलनाचे आकर्षण होते. त्यामुळेच या पथसंचलनाच्या त्रिवेणी संगमावर नागपूरकरांनी पुष्पवृष्टी केली.
संघाचा विजयादशमी उत्सव देशभरातील विविध नगरांत, महानगरांत आणि अन्य छोट्या मोठ्या गावांत साजरा केला जातो, पण नागपूरच्या उत्सवाचे महत्त्व वेगळे आहे. कारण संघाची स्थापना नागपूरला झाली आणि नागपूरच्या विजयादशमी उत्सवाला दरवर्षी परमपूजनीय सरसंघचालक उपस्थित असतात.dr mohanji bhagwat त्यामुळे नागपूरच्या विजयादशमी उत्सवाचे नागपुरातीलच नाही तर देश आणि विदेशातील स्वयंसेवकासाठी मोठे आकर्षण असते. यावेळी तर या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले. याआधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कितीही मोठी व्यक्ती उपस्थित असली तरी सर्वांना सरसंघचालक या कार्यक्रमात काय बोलतात, याचीच उत्सुकता असते. या कार्यक्रमात सरसंघचालकांच्या भाषणातून स्वयंसेवकांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर संघाची भूमिका काय आहे, हे जसे समजते, तसेच पुढील वर्षभरातील संघाच्या वाटचालीची दिशाही मिळत असते. परमपूजनीय सरसंघचालकांच्या या पाथेयातून प्रेरणा घेत संघाचे स्वयंसेवक राष्ट्रवादी विचारांचे सिंचन आपल्या कृतीतून आपल्या आजूबाजूच्या परिसरात करत समाजउभारणीसोबत राष्ट्रउभारणीच्या यज्ञकुंडात आपली छोटी आहुती टाकत असतात.
 
शताब्दीनिमित्त रा. स्व. संघाने देशभरातील चार महानगरांत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिला त्रिदिवसीय संवाद कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीच्या विज्ञान भवनात पार पडला. शेवटच्या दिवशी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर उपस्थितांशी मनमोकळी चर्चा करताना संघाची भूमिका स्पष्ट केली होती. तरी पण यावर्षीच्या कार्यक्रमात डॉ. मोहनजी भागवत काय बोलणार, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. जग आज इतके छोटे झाले आहे की, एका देशात पाऊस पडला तर बाजूच्या देशातील लोकांना सर्दी होते. यातील गंमत बाजूला ठेवली तरी जग एकमेकांच्या अतिशय जवळ आले आहे. त्यामुळे एका देशात घडलेल्या कोणत्याही बèया-वाईट घटनेचा परिणाम त्याच्या आजूबाजूच्या देशांवर होत असतो. त्यामुळे अमेरिका जेव्हा भारतावर आयात शुल्क लादते (टेरिफ) तेव्हा त्याचा परिणाम फक्त भारतावर नाही तर अन्य देशांवरही होत असतो. अमेरिकेने लादलेल्या टेरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात तरी परिणाम होणारच आहे, त्यामुळे यातून बाहेर येण्यासाठी स्वदेशी आणि आत्मनिर्भरता याला पर्याय नसल्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले, ते अतिशय समर्पक म्हणावे लागेल. स्वदेशीचा वापर जसा वाढेल तशी आपली आयात काही प्रमाणात कमी होणार आहे. आज आपण आम्ही फक्त निर्यात करू, आयात करणार नाही, असे म्हणू शकत नाही. आयात आणि निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक संबंध हे आपण टाळू शकत नाही. मात्र ते आपल्या देशाच्या अटी आणि शर्तींवर असले पाहिजे, आपला नाईलाज म्हणून नाही, असे डॉ. भागवत म्हणाले, जे कोणालाच नाकारता येणार नाही.
 
संघटित असा हिंदू समाज बलसंपन्न आणि शीलसंपन्न असणे ही देशाच्या एकतेची, एकात्मतेची, विकासाची आणि सुरक्षेची हमी असल्याचा निर्वाळा डॉ. भागवत यांनी दिला. हिंदू समाजाची मानसिकता ही कधीच विघटनवादी नाही तर सर्वसमावेशक आहे. हिंदू समाजच खèया अर्थाने वसुधैव कुटुंबकम्च्या उदार विचारधारेचा पुरस्कर्ता आणि संरक्षक आहे, या त्रिकालाबाधित सत्याची त्यांनी जाीणव करून दिली. श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशातील अस्थिर राजकीय परिस्थितीचाही डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. हे आमचे शेजारी देश असले तरी ते सांस्कृतिकदृष्ट्या आणि दैनंदिन संबंधामुळे आमच्याशी जोडले आहेत, आमच्या परिवाराचा ते भाग आहेत, त्यामुळे त्याठिकाणी शांतता आणि स्थिरता राहणे हे आमच्या देशाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे, नव्हे ती आमची भौगोलिक गरज आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. कोणतीही क्रांती वा अपेक्षित बदल हा हिंसक मार्गाने नाही तर लोकशाही मार्गाने शक्य होत असतो, याचा दाखला देत भारतातही असा प्रकार घडवण्याचा काही अंतर्गत आणि बाह्य शक्तींचा प्रयत्न राहू शकतो, असा सावधगिरीचा इशारा त्यांना दिला आहे. समाजात आमूलाग्र परिवर्तन लोकशाहीच्या मार्गानेच होऊ शकते.dr mohanji bhagwat राष्ट्रीय सुरक्षा हा नेहमीच सगळ्यांच्या चिंतेचा विषय राहिला आहे. मोदी सरकारच्या कठोर भूमिकेमुळे नक्षलवादाची समस्याही शेवटचे आचके देत आहे. मात्र नक्षलवादाची समस्या ज्या परिस्थितीतून समोर आली त्या परिस्थितीच्या मुळाशी आपल्याला जावे लागेल, असे डॉ. भागवत म्हणाले. आदिवासींचे काही घटकांकडून होणारे शोषण, त्यांच्यावरील अन्याय आणि त्या भागातील विकासाचा अभाव याचा आम्हाला विचार करावाच लागेल, या शब्दात डॉ. भागवत यांनी प्रशासन आणि सरकारचे कानही टोचले.
 
पर्यावरणीय बदलाचा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा वातावरणावर होणाèया परिणामांचाही डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. संपूर्ण देशाला ढवळून काढणाऱ्या पहलगाम हल्ल्याला सरकार तसेच सुरक्षा दलांनी जशास तसे उत्तर दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. हिंदुत्व आणि भारतीयत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे ते म्हणाले. विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख आणि संस्कृती आहे, पण आज भाषा, संस्कृती, राहणीमान आणि खानपान यांचे भांडवल न करता आम्ही सर्व एक आहोत, हा भाव जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.
संघाच्या दैनंदिन शाखांचे महत्त्व आणि आवश्यकता विशद करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी संघाच्या येत्या वर्षभरातील पंच परिवर्तन या राष्ट्रव्यापी अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्व-बोध आणि स्वदेशी यांचे महत्त्व त्यांनी प्रतिपादित केले. घरातल्या वडिलधाèया व्यक्तीने कुटुंबातील मुलांना त्यांच्या दीर्घकालीन भल्यासाठी आत्मीयतेच्या पण परिणामकारक अशा चार गोष्टी सांगाव्या, तसे डॉ. मोहनजी भागवत यांचे हे भाषण होते. काही वेळा त्यांनी डोळ्यात झणझणीत अंजन टाकताना प्रशासन आणि सरकारचे कान टोचले तर काही वेळा पाठीवर कौतुकाची मनमोकळी थापही दिली. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करणे हे आमचे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, त्यातूनच आमचा विश्वगुरुपदापर्यंतचा प्रवास होणार आहे. डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणाचा हाच शोध आणि बोध म्हटला पाहिजे.