म. गांधी जयंती राष्ट्रभती, एकता आणि सत्य-अहिंसा या मूल्यांची आठवण करून देतो

पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचे प्रतिपादन

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
Shankarprasad Agnihotri, महात्मा गांधी जयंती हा दिन भारतीय जनतेच्या मनामनांत एक अद्वितीय जागा घेऊन उभा राहतो. त्यांचे विचार, आचरण व कार्यांनी संपूर्ण जगाच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली. सत्य, अहिंसा, करुणा यांना जीवनातील सर्वोच्च मूल्य मानणारे गांधीजी राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. त्यांनी अन्यायाला कधीही मान्यता दिली नाही. तसेच शस्त्र न उचलता समाजातील दडपशाहीविरुद्ध संघर्ष करण्याचे सामर्थ्य जनतेत निर्माण केले. त्यांचा सत्याग्रह हा केवळ आंदोलनाचा प्रकार नव्हता, तर ती सत्यासाठीची आत्मशती व नैतिक धैर्याची निर्मळ अभिव्यती होती. गांधी जयंती आपल्याला राष्ट्रभती, एकता आणि सत्य-अहिंसा या मूल्यांची आठवण करू देतो, असे प्रतिपादन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.
 
 

Shankarprasad Agnihotri, 
महात्मा गांधी जयंतीनिमित्त अग्निहोत्री महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक शांततामय व शिस्तबद्ध दिशा मिळाली. ते स्वतः साध्या जीवनाचे आचरण करत आणि स्वावलंबनाचा संदेश देत असे. खादीचा प्रसार करून त्यांनी देशवासियांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना जागवली. प्रामाणिकता व सत्य हे केवळ वैयतिक जीवनापुरते मर्यादित न राहता राष्ट्रजीवनाच्या उभारणीसाठीही आवश्यक आहे. खरी शती ही प्रेमात आणि अहिंसेत आहे, अशी शिकवणही गांधीजींनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या काळात महात्मा गांधींच्या विचारांची गरज अधिक प्रकर्षाने भासते. समाजात वाढत चाललेली स्पर्धा, असहिष्णुता आणि अन्याय यादरम्यान गांधीजींनी शिकवलेली सहिष्णुता, शांती आणि बंधुता हीच खरी दिशा दाखवणारी ठरते. आपण प्रामाणिकपणा, साधेपणा, परस्पर सन्मान आणि न्याय या मूल्यांवर आधारित जीवन जगू शकलो, तरच आपण गांधीजींच्या आदर्शाचे पालन करतो आहे, असे मानले जाईल. महात्मा गांधी जयंती हा केवळ एखाद्या महापुरुषाच्या स्मरणाचा दिवस नाही, तर तो आपल्याला आपल्या जीवनमूल्यांचे पुनरावलोकन करण्याचीही संधी देतो, असेही ते म्हणाले.
 
 
कार्यक्रमाला महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.