चंद्रपूर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील आगरझरी प्रवेशद्वार येथे दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्व जिप्सी सफारी वाहने केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निर्णय 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू यांनी कळविले आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी 1 ऑक्टोबर रोजी मोहर्ली येथील वन पर्यटन प्रवेशद्वार येथे झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने, स्थानिक नागरिकांच्या हितासाठी प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एक दिवस एका बफर प्रवेशद्वारावर एका सत्रासाठी काही जिप्सी राखीव ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव कार्यकारी समितीकडे मंजुरीस्तव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन, बफर विभागातील आगरझरी प्रवेशद्वार येथे दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्व जिप्सी सफारी वाहने (म्हणजेच एकूण 6 जिप्सी) केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच यामध्ये एका जिप्सीसाठी (6 सीटर) 5 हजार एवढे शुल्क आकारले जाईल, असा निर्णय कार्यकारी समितीद्वारे घेण्यात आलेला आहे. ही जिप्सी बुकिंग उपसंचालक (कोर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयातील क्रुझर बुकिंग काउंटर येथेच सफरीच्या 7 दिवस आधीपासून एकदिवस आधीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करू शकतात. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, प्रतिसाद अनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, तसेच याची अंमलबजावणी बुधवार, 8 ऑक्टोबर पासून करण्यात येईल.
सद्यस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून स्थानिकांच्या सोईसाठी 9 सिटर क्रुझर सुरु असून, मोहर्ली प्रवेशव्दाराकरीता 4 क्रुझर व कोलारा प्रवेशव्दाराकरिता 3 क्रुझर कार्यरत आहेत. तसेच प्रती दिवस 14 क्रुझरव्दारे सकाळ व दुपार फेरीकरीता एकूण 126 पर्यटकांना प्रवेश देता येतो. क्रुझर सफारी सेवा शुल्क केवळ 720 रुपये असून, त्यात कॅमेरा शुल्कामध्ये 100 टक्के सुट देण्यात आलेली आहे, अशी माहिती आनंद रेड्डी येल्लू यांनी दिली आहे.