politics कोणत्याही राजकीय पक्षास किंवा नेत्यास राजकारणात यशस्वी होण्यासाठी जनाधार हीच महत्त्वाची बाब असते असे मानले जात असले, तरी ते एकमेव सत्य नाही. राजकारण हा जनाधारापेक्षाही बुद्धीच्या जोरावर आणि सावधगिरीने खेळावयाच्या चालींचा खेळ आहे, हे जनाधाराहूनही मोठे सत्य आहे. म्हणूनच, राजकीय पक्षांचे नेते काही विधाने अत्यंत सावधगिरीने करताना दिसतात. अशा विधानांतून त्यांना भविष्यातील बेरजा, वजाबाक्या, भागाकार, गुणाकाराची गणिते सहज सोडविण्याच्या शक्यता साधावयाच्या असतात. राजकारणात कोणीही कोणाचाही कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, हे राजकीय नेत्यांच्या तोंडून सतत ऐकविले जाणारे एक राजकीय क्षेत्रातील लोकप्रिय वाक्य म्हणजे याच सावधगिरीचा आणि चातुर्याचा नमुनेदार खेळ असतो. केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी पक्षांतील नेतेही त्याचा प्रसंगानुरूप वापर करतातच, पण राजकारणात बस्तान बसवू पाहणारा एखादा नवोदित नेता किंवा प्रस्थापित नेताही हे वाक्य वापरताना दिसतो. असेच आणखी एक वाक्य वापरणारे नेते राजकारणातील सर्वांत धूर्त नेते मानले जातात. राजकारणात उद्या काय घडेल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही असे सांगत हे नेते आपल्या राजकीय चाली बदलत किंवा घडवत असतात.

उद्या काय घडवायचे आहे, याचे आडाखे मनाशी बांधूनच करावयाच्या या चालींचा मागमूस प्रतिस्पर्ध्यांस लागू नये यासाठी अशी वाक्ये वापरणे गरजेचेच असते. त्यामुळे, ज्याच्या तोंडून हे वाक्य अनेकदा ऐकावयास येते, त्याच्या मनात, प्रतिस्पर्ध्यास कात्रजच्या घाटाची भटकंती घडविण्याचा किंवा धोबीपछाड देण्याच्या चालींचे डावपेच सुरू आहेत, हे नक्की समजून जावे एवढा शहाणपणा अलिकडे राजकारणात सर्वांच्या अंगी पुरता मुरलेला आहे. पण राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, हे वाक्य मात्र, अलिकडच्या राजकारणाच्या मैदानावरचे शाश्वत सत्य आहे, याबाबत कोणाचेच दुमत असत नाही. या एका वाक्यानेच राजकीय पक्षांना किंवा नेत्यांकरिता अनेक राजकीय संधींची दारे स्वत:साठी कायमची खुली ठेवणे शक्य होत असल्याने व तशी गरज प्रत्येकासच कधी ना कधी भासत असल्याने या वाक्याबाबतही कधीच कोणाचेच दुमत नसल्याचे दिसून येते. कदाचित त्यामुळेच, काही व्यक्तिगत हेवेदाव्यांतून आणि नेतृत्वाच्या मुद्यावरून दोन दशकांपूर्वी एकमेकांपासून अलग होऊन स्वत:ची वेगळी चूल मांडत प्रस्थापित मातृपक्षाला शह देणाèयांना आता जुने शत्रुत्व विसरून नवे मैत्र जोडण्याची वेळ आली नसती. हा संदर्भ पाहता, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संभाव्य ऐक्याचे नगारे अनेकांच्या कानात वाजू लागले असतील. ते अगदीच अनाठायीही नाही. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हे वाक्य सध्याच्या घडीला या दोन्ही गट-पक्षांच्या सोयीचे ठरू पाहत आहे. अर्थात, अशा प्रक्रियेचा शेवट नेमका कसा होणार हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी शत्रूचा मित्र होण्याची ही प्रक्रिया तितकीशी सोपी नसतेच, हे गृहीतच धरावयास हवे. कारण कालच्या जुन्या शत्रूशी पुन्हा मैत्र जोडण्याची वेळ कोणावरही आलीच, तर त्याच्या फायद्या-तोट्याची काही गणिते दोघांसही मांडावी लागत असतीलच आणि दोघांच्याही दृष्टीने त्याचे उत्तर बेरजेचेच असेल, तरच जुने शत्रू कायमचे शत्रुत्व गाडून टाकून उभय पक्ष मैत्रीचा धागा एकमेकांच्या मनगटात बांधणार हेही ओघानेच आले.
महाराष्ट्रातील या दोघा जुन्या शत्रूंच्या नव्या मैत्रीचे प्रयत्न काही आजचे नाहीत. एकमेकांस खिडकीतून डोळे मारणे, कोणीतरी टाळीसाठी हात पुढे करून प्रतिसादाची प्रतीक्षा करणे, हे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. त्यांनी शत्रुत्व विसरून पुन्हा एकत्र यावे यासाठी हितचिंतकांच्या सदिच्छांचा दबाव आणण्याचे व त्याद्वारे वातावरणनिर्मिती करण्याचे प्रयत्नही तसे जुनेच आहेत. यांनी एकत्र यावे यासाठी अनेक निष्ठावंतांकरवी देव पाण्यात घालण्याचे प्रयत्नही कुठेकुठे पार पडले आहेत. तेव्हाही, केवळ मागणीचा दबाव, कार्यकर्त्यांची इच्छा किंवा राजकीय गरज यापैकी काहीतरी घडते म्हणून शत्रुत्व विसरून मित्र होण्याची गणिते मांडली गेलीच होती आणि त्याची अपेक्षित उत्तरे न मिळाल्यानेच, पुन्हा मित्र होण्याच्या त्या प्रक्रियेस खीळ बसली होती. एक काळ तर, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण शिवसेनेच्या दृष्टीने पुरता संपलेला पक्ष होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी, सन 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी तर राज ठाकरेंच्या पक्षाबाबत काही टिप्पणी करण्यास याच भावनेतून जाहीर नकार दिला होता. संपलेल्या पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही असे सांगून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडविली, तेव्हा अर्थातच, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती राज्याची सत्ता होती आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोनिया गांधींची काँग्रेस हे दोन पक्षदेखील सोबतीला होते. साहजिकच, तेव्हाच्या सत्ताधीश शिवसेनेच्या दृष्टीने राज ठाकरेंच्या पक्षाकडे राजकीयदृष्ट्या गमावण्यासारखे किंवा कमावण्यासारखे काहीच शिल्लकही नसल्याने, आदित्य ठाकरे यांनी मारलेला हा शेरा साहजिकच होता, पण अन्य कोणत्याही परिपक्व राजकीय नेत्याने कोणत्याही परिस्थितीत असे भविष्यात अडचणीत आणू शकणारे वाक्य बेधडक उच्चारले नसते. कारण, अशा वाक्यांचा हिशेब देण्याची वेळ भविष्यात येऊ शकते आणि अशी वाक्येच भविष्यात कायमच्या शत्रूला कायमचा मित्र बनविण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणू शकतात, एवढी जाणीव परिपक्व नेत्याच्या अंगी असावयास हवी. आदित्य ठाकरे यांचे ते वाक्य आज राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव ठाकरेंची शिल्लक शिवसेना यांच्या पुनर्मिलनाच्या प्रक्रियेच्या एका नाजूक टप्प्यावर पुन्हा समोर उभे राहिल्याने, शत्रू-मित्र सिद्धान्तास प्रत्यक्षात येणे काहीसे अवघड ठरणार आहे.
राजकारणात उद्या काय घडेल हे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही, असे शरद पवार अनेकदा म्हणत असतात, पण तरीही, अनेकदा ते काही भाकितेही वर्तवत असतात. त्यापैकी बरीचशी भाकिते चुकतात आणि काही भाकिते केवळ योगायोगाने बरोबर येतात. पण राजकारणात हे चालतेच. कोणीही कितीही मुरलेला ज्योतिषी असला, तरी राजकारणातील भविष्य वर्तविणे सोपे नसते, हे त्यास माहीत असते. त्यामुळे, ठोकताळे हेच भाकीत असल्याच्या आविर्भावात काही जण छातीठोक भाकिते वर्तविण्यात अनेकदा पुढाकार घेतच असतात. शरद पवार तर ज्योतिषी नाहीतच, त्यामुळे त्यांची भाकिते चुकली तरी त्यांच्या चालींचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने प्रतिस्पर्ध्यांस अनेकदा त्याचा उपयोगही होतो. त्यांनी वर्तविलेल्या भाकिताच्या नेमके उलटेच घडविणार अशीही अनेकांची ठाम समजूतही असते आणि तसे गृहीत धरूनच शरद पवारांच्या संभाव्य चालींचा अंदाज घेत आपली राजकीय चाल ठरविण्यात अनेकांस यशदेखील आले आहे. अजित पवार हे शरद पवारांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते असताना, एका गावातील सभा किंवा मेळाव्यातील त्यांचे धरणाच्या पाण्याविषयीचे एक विधान मोठे वादग्रस्त ठरले होते. त्या विधानाचे राजकीय परिणाम एवढे वादग्रस्त झाले की त्याची राजकीय फळे अजितदादांना दीर्घकाळ भोगावी लागतील असे एक भाकीत खुद्द शरद पवार यांनीच तेव्हा वर्तविले होते.politics त्यांच्या या गंभीर वक्तव्यामागील पक्षांतर्गत राजकारणाचा सुगावा ज्यांना लागला त्यांना शरद पवार यांच्या भविष्यकालीन राजकीय खेळींचा अंदाजही त्याच वेळी आला होता, असे म्हणतात. त्यानंतरचा काळ ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादळापूर्वीची शांतता होती, याचाही अंदाज अनेकांस येऊ लागला होता. पक्षात पडलेली फूट ही तेव्हा पेरल्या गेलेल्या चालींच्या बीजाची अनपेक्षित फळे होती, असेही पुढे स्पष्ट होत गेले आणि कात्रजच्या घाटाच्या चाली खेळण्याकरिता मिळविलेल्या बाळकडूमुळेच अजितदादांना बाजी परतविणे शक्य झाले. भविष्यात काय होईल हे सांगण्याकरिता मी काही ज्योतिषी नाही असे सांगणारे शरद पवार आता स्वत:च आपल्या हाती असलेल्या गटाच्या भविष्याकरिता सारे दरवाजे खुले ठेवू पाहात आहेत, हे त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल. ज्या अजितदादांनी नेतृत्वाच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त करत वेगळी चूल मांडली, त्याच अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घ्यावयाचा आहे, असे सावधपणे सांगत शरद पवार शत्रू-मित्र सिद्धान्ताचा आधार घेऊन संधींची दारे खुली ठेवू पाहात आहेत. आणि संपलेल्या पक्षाविषयी मी काही बोलणार नाही अशी दर्पोक्ती करणाèया आदित्य ठाकरे यांच्या पित्याचा पक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचे दोन दशकांचे वैर मिटवून त्यांच्या आधाराची प्रतीक्षा करू लागला आहे. कोणी कोणाचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, या सिद्धान्ताचे हे सध्याच्या राजकारणातील दोन दृष्टान्तच म्हणावे लागतील.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाचा, वक्तृत्वाचा आणि क्षमतेचा राज्यात सर्वत्र मोठा प्रभाव होता. किंबहुना, शिवसेनेच्या बांधणीतही त्यांचा वाटा निर्विवादपणे उद्धव ठाकरे यांच्याहून अधिक होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षाचा सर्वोच्च नेता मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा एक सामान्य नेता म्हणून काम करण्यास ते नाखूश होते. त्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षदेखील राज ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या एकखांबी तंबूवरत महाराष्ट्रात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याएवढा सक्षमही ठरला आणि राज ठाकरे यांच्या अंगी नेतृत्वाची पुरेपूर क्षमता वारंवार सिद्धही झाली. आता चित्र बदलले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या हाती शिल्लक राहिलेला पक्ष पुरता दुबळा झाला आहे आणि दिवसागणिक त्यास नवी गळतीही लागताना दिसत आहे. शिवाय, महापालिका वगैरेंसारख्या सत्तेच्या जागादेखील हातून गमावल्याने, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची एकट्याने वाटचाल करण्याएवढी मजबूत स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे आता कोणाच्या तरी आधाराच्या कुबड्या घेऊन राजकारणात जेमतेम उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अपरिहार्यता ठरली असतानाच, मराठीच्या मुद्यावरून राज व उद्धव यांना ऐक्याची संधी चालून आली. एका पक्षाकडे कमावण्यासारखे काही नाही आणि दुसèयाकडे गमावण्यासारखे काही नाही, असे दोन पक्ष एकत्र आले, तर या दोन्ही समस्यांतून मार्ग काढता येईल, हा हिशेबही त्यामागे होताच. त्यामुळे, जेमतेम काही महिन्यांपूर्वी एका सभामंचावर एकत्र येऊन राज आणि उद्धव ठाकरे यांनी हातात हात घेऊन ते उंचावले आणि शत्रुत्व संपावे यासाठी दीर्घकाळ वाट पाहणाèया शिवसैनिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्यानंतरचा कालपरवापर्यंतचा दोघांच्या ऐक्याच्या वाटचालीच्या काळावर मात्र, पुन्हा एकदा संभ्रमाचे सावट पसरले आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार, पुन्हा एकदा दोघे नेते हातात हात घालून ऐक्याची ग्वाही देणार आणि ठाकरे ब्रॅण्ड म्हणून दोघांनीही ज्या शक्तीचा उल्लेख केला होता, त्या शक्तीचे प्रदर्शन घडविणार अशी जोरदार चर्चा घडवून आणली गेली. प्रत्यक्षात मात्र, राज ठाकरे त्या मेळाव्याकडे फिरकले तर नाहीतच, पण या विषयावर त्यांच्या पक्षातही जाणीवपूर्वक शांतता असल्याचेच दिसू लागले आहे. ऐक्याच्या प्रश्नावर कोणीही बोलावयाचे नाही अशी स्पष्ट तंबी राज ठाकरे यांनी तेव्हाच मनसेच्या कार्यकर्त्यांस देऊन ठेवली होती, त्यामुळे तो मुद्दा मौनात असताना, आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पाठ दाखविली आहे.politics संपलेल्या पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही असे सांगत राज ठाकरेंच्या पक्षाची खिल्ली उडविणाऱ्या आदित्य ठाकरे यांना आता आपल्या त्या विधानानंतरच्या परिणामांची जाणीव झाली असेल, अशी कुजबूज सध्या त्या पक्षात सुरू आहे. शिवाय, आपल्या नेतृत्वाच्या प्रभावाने शिवसेनेची बांधणी आणि उभारणी करण्यात सिंहाचा वाटा बजावणारे राज ठाकरे आता केवळ उद्धव ठाकरेंच्या गटाची गरज म्हणून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतील का, हा प्रश्नही या पक्षांतील दोन्ही बाजूंना पडला आहे. संपलेल्या पक्षाविषयी मी काही बोलणार नाही, असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या गटाला आता तरी, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हे सार्वत्रिक सत्य राजकीय स्वीकारून तडजोडीची भूमिका घ्यावी लागेल, कारण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकरिता अस्तित्वाची अटीतटीची लढाई आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हा सिद्धान्त वापरून घेण्याची हीच संधी आहे, हे ओळखून ऐक्याचे प्रयत्न सुरू झाले असले, तरी नेतृत्वाच्या मुद्यावरून दुभंगलेली मने पुन्हा सांधली जातील का, याबाबतचे भाकीत वर्तविण्याचे धाडस कोणता ज्योतिषी करेल का?