भारत विश्वगुरू होणं हे नियती आहे : भय्याजी जोशी

* रा. स्व. संघ वर्धा नगराचा विजयादशमी उत्सव

    दिनांक :05-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
Bhaiyaji Joshi-RSS-Vijayadashami : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ‘आम्ही भारताचे लोकं’ असा उल्लेख केला आहे. यातून एक श्रेष्ठभाव निर्माण झाला आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत हा भाव निर्माण झाला पाहिजे. देशाची सर्वतोपरी प्रगती होते आहे. ‘स्व’चा सन्मान, स्वाभिमान न घालवता काम केले पाहिजे. काही अज्ञान दूर होण्याची गरज आहे. जगातील सर्व देश आपआपल्या बळावर उभे राहिले पाहिजे. इंग्रजी मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे. चांगल्या सवयी सार्वजनिक जीवनात असल्या पाहिजे. जागृत संघटीत शक्ती देशाचे भाग्य निश्चित करणार आहे. सर्व सत्ता आपल्याच कब्जात हे भारताचे कधीच स्वप्न नव्हते. जगाला मार्गदर्शन करणारा देश आम्हाला हवा आहे. विश्वगुरू भारत होणं ही नियती आहे, ते होणार असल्याचे उद्बोधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय निमंत्रित सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.
 
 
 

JOSHI 
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्धा नगराच्या आज रविवार ५ रोजी स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून वर्धेतील प्रसिद्ध आकार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश चन्नावार होते तर व्यासपिठावर जिल्हा संघ चालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची उपस्थिती होती. भय्याजी जोशी पुढे म्हणाले की, भारत सामर्थ्य संपन्न करायचा असेल तर आत्मसंरक्षण अतिशय आवश्यक आहे. भारताने काही जीवनमुल्ये दिली आहेत. त्या जीवनमुल्यांचे रक्षण समाजाने करायचे आहे. भारताचा इतिहास सामर्थ्याचा आहे. येथे सकारात्मक दृष्टी आहे. सामाजिक जीवनात १०० वर्षे फार कमीही नाहीत आणि जास्तही नाहीत. १०० वर्षे अनुभव खुप आहेत. परंतु, परिणाम म्हणून कमी असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.
 
 
ब्रह्मांडाची रचना चक्राकार आहे. चक्र गतिमान होतं. उत्थान आणि पतन हे निसर्गाचं काम आहे. पतनाच्या टोकावर गेल्यावर ज्याच्याकडे आंतरिक शक्ती आहे त्याचेच उत्थान होते. भारताची शक्ती मोठी आहे. जगाला देणारा भारत उभा होतो आहे. उणिवा, कमतरता आणि दोष दूर केले पाहिजे. आमचा भारत श्रेष्ठ भारत म्हणून उभा होतो आहे. संकुचित भाव दूर केला पाहिजे. स्पृश्य अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. त्याला आमच्या धर्मग्रंथांमध्ये कुठेच स्थान नाही. देशाबद्दल समाजातील अज्ञान दूर होण्याची आवश्यकता आहे. आपण मानसिक गुलामीत आहोत. इंग्रज गेले पण आपण इंग्रजी मानसिकतेतून बाहेर निघालो नाही. ती जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. इंग्रजीशिवाय चालत नाही, असे होऊ नये. चिन, जापान, रशिया इंग्रजी बोलत नाही. त्यांची गाडी कुठे अडली नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिक उत्पादनांसाठी आग्रही आहेत. स्वदेशीसाठी किंमत द्यावी लागेल, असे भय्याजी जोशी म्हणाले. चांगल्या गोष्टी कुटुंब व्यवस्थेतून आल्या पाहिजे. आम्ही भोगवादाकडे वळतो आहेत. भारताची कुटुंब व्यवस्था श्रेष्ठ आहे. ती टीकून राहिली नाही तर जगाला कुटुंब व्यवस्था कोणी दाखवू शकणार नाही, असे मार्गदर्शन भय्याजी जोशी यांनी केले.
 
 
भारत मृत्यूंजय आहे : भय्याजी जोशी
 
 
कलियुगात संघटनशती आवश्यक आहे. भारताची शक्ती मोठी आहे. भारत मृत्यूंजय आहे. भारताने मृत्यूवर विजय मिळवला आहे. तुम्ही आम्ही अमृत पुत्र आहोत. आता भारताला नष्ट करण्याचे सामर्थ्य कोणत्याही शतीत नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला दुसर्‍या देशांनी बाजार समजू नये. आपली उत्पादनं टाकणारा देश भारत समजू नये. आमचा देश ज्ञानसंपन्न देश असल्याचे मार्गदर्शन रा. स्व. संघाचे अ. भा. निमंत्रित सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.
 
 
भय्याजी जोशी पुढे म्हणाले की, आपल्याकडे शौर्याची कमी नाही. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर आपण ५-५ युद्ध लढलो. त्यापैकी १९६२ चे युद्ध सोडले तर सर्व युद्ध आपण जिंकलो. आपल्याला निसर्गाने खुप काही दिले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येतील. आपल्या भरोश्यावर ते त्यांचा देश श्रीमंत करतील. यासाठी आपल्याला आता सजग झाले पाहिजे. आम्ही भीकेचा कटोरा घेऊन फिरणारे नाही. आम्ही देणारे आहोत. भीक मागणारा, दयेवर चालणारा भारत कधीच नव्हता. १९४७ नंतर भारताने प्रगती केली. विद्वावांनी झेप घेतली. डॉ. होमीभाभा ते अब्दुल कलामपर्यंत सर्वांनीच प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत. एकेकाळी अमेरिकेने पाठवलेला निकृष्ठ गहू खाण्याची वेळ आपल्यावर आली होती. आज आपण अन्न धान्य इतर देशांना पाठवू शकतो. भारताच्या प्रगतीचा आलेख युवा संकल्प शतीच्या बळावर या ठिकाणी पोहोचला असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.
 
 
प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख व आभार प्रदर्शन नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांनी केले. पथसंचलन निघताच पावसाला सुरुवात झाली. पावसानही पथसंचलन झाले. मैदानात ओले असतानाही प्रात्यक्षिक, योगासनं झाली. सुभाषित, अमृत वचन, सांघिक गीत झाले. स्वयंंसेवकांनी ओल्या मैदनात बसुन मान्यवरांचे विचार आत्मसात केले.
 
 
कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, संत सयाजी महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रकाश महाराज वाघ, भन्ते डॉ. अभय बोधी, महानुभाव पंथाचे सेवतकर बाबा, प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमच्या माधुरी दिदी, मैथीली दिदी, एमगिरीचे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे, दत्ता मेघे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललीत वाघमारे, प्रदीप बजाज, आशिष गोस्वामी, अरुण काशिकर, अरुण केळकर, नपचे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, मयुर महाराज, हेमंत महाराज, आशिष तिवारी, महेश गुल्हाणे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
 
संघाचा गौरवशाली इतिहास :चन्नावार
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे झाली आहेत. संघ अद्वितीय राजकीय व्यक्तिमत्त्व घडवत आहे. ही संघटना नव्हे तर राष्ट्रभक्त येथे निर्माण केले जातात. तरुणांमध्ये शिस्त निर्माण केली जाते. तेच तरुण भारताच्या सेवेसाठी पुढे आले असल्याचे प्रतिपादन आकार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिनेश चन्नावार यांनी केले. संघाचा गौरवशाली इतिहास आहे. संघाने मोठे जाळे तयार केले. त्यासाठी १०० पैकी १०० गुण दिले पाहिजे, अशे चन्नावार म्हणाले.