गोंदिया,
gondia paddy जिल्ह्यातील धान उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला असताना शुक्रवारी शासनाने धान खरेदीचे 125 कोटी 77 लाख 47 हजार 225 रुपयाचा निधी जिल्हा पणन कार्यालयाकडे हस्तांतरीत केल्याने धान उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे. येत्या दिवसांत ही रक्कम केंद्रावर धान विक्री करणार्या शेतकर्यांच्या बँक खात्यावर टप्प्या-टप्प्याने थेट डीबीटी प्रणालीद्वारे हस्तांतरीत केली जाणार आहे.
धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात 1.90 लाख तर रब्बी हंगामात 70 हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन घेतले जाते. व्यापार्यांकडून धान उत्पादकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यात जिल्हा पणन कार्यालय व आदिवासी विकास महामंडळाच्या उपअभिकर्ता संस्थांकडून शासकीय हमी दराने दोन्ही हंगामात धान खरेदी केली जाते. दर हंगामात ही खरेदी विविध कारणाने प्रकाश झोतात राहते. मागील चार महिन्यांपासून शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांनी धान विक्री केले. धान विक्री केल्यानंतर आठवडाभरनंतर शेतकर्यांना विक्री केलेल्या धानाची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. मात्र त्यांना महिनोमहिने रक्कम मिळत नाही. शासन व प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे धान उत्पादक आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील 186 केंद्रावर 53158 शेतकर्यांनी 25 लाख 13 हजार 344 क्विंटल धान विक्री केले. याची एकूण किमत 578 कोटी 6 लाख 91 हजार 361 आहे. गत महिन्यापर्यंत 351 कोटी 31 लाख 24 हजार 811 रुपये तर 3 ऑक्टोबर रोजी 125 कोटी 77 लाख 47 हजार 225 रुपये, असे 477 कोटी 8 लाख 72 हजार 36 रुपये जिल्हा पणन कार्यालयाकडे शासनाने वर्ग केले आहेत. आतापर्यंत 37211 शेतकर्यांच्या खात्यावर 366 कोटी 40 लाख 5 हजार 580 रुपये वर्ग झाले आहेत. उर्वरित शेतकर्यांच्या बँक खात्याात टप्प्या-टप्प्याने रक्कम हस्तांतरीत केली जात आहे. शासनाकडून 10 कोटी 98 लाख 19 हजार 325 रुपये लवकरच प्राप्त होणार असून धान उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे.
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात विक्रमी धान खरेदी झाली आहे. खरेदीची संपूर्ण प्रक्रीया आभासी आहे. 31 जुलैपर्यंत धान विक्रीची रक्कम प्राप्त झाली आहे. शेतकर्यांना धानाची रक्कम टीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने हस्तांतरीत केली जात आहे. उर्वरीत रक्कमेसाठी शासनस्तरावर पाठपुरवा केला आहे.
विवेक इंगळे,जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया