चूक मुख्याध्यापकांची; शैक्षणिक फटका विद्यार्थिनीला

सेलुकाटेच्या जवाहर नवोदयातील धकादायक प्रकार

    दिनांक :05-Oct-2025
Total Views |
वर्धा,
Jawahar Navodaya Selukate controversy,  प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला जवाहन नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापकांनी फोनद्बारे पाल्याचा प्रवेश नवोदय मध्ये करून घेण्याची सूचना केली. पालकानेही ज्या शाळेत आपल्या मुलीला दाखल केले होते तेथून शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे गोळा केली. नंतर नवोदयच्या मुख्याध्यापकांनी पुन्हा या पालकास फोन करून तुमच्या मुलीचा प्रवेश आमच्या शाळेत होणार नाही असे सांगितल्याने विद्यार्थिनीसह पालकही अडचणीत आले.
 
 

Jawahar Navodaya Selukate controversy,  
पवनार येथील अतुल डंभारे हे रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जवाहर नवोदय विद्यालयात मुलीला सहाव्या वर्गात प्रवेश मिळावा यासाठी विनंती अर्ज केला. प्रवेश प्रक्रियेसाठी झालेल्या परीक्षेत मुलीने उत्तम कामगिरी केली. शिवाय तिचे नाव प्रतीक्षा यादीत आले. पण शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डंभारे यांनी मुलीला वर्धा येथील एका शाळेत दाखल केले. अशातच ४ ऑटोबरला अतुल डंभारे यांना नवोदय विद्यालयातून फोन आला. तुमच्या मुलीला नवोदय विद्यालयात प्रवेश हवा असल्यास शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्र घेऊन सोमवार ६ रोजी सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालयात या, असे सांगण्यात आले. डंभारे यांनी तातडीने शाळा सोडल्याचा दाखला व इतर कागदपत्रे मिळविली. ५ ऑटोबरला जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी पुन्हा अतुल डंभारे यांना कॉल करून तुम्ही मुलीच्या प्रवेशासाठी येऊ नका असे सांगितले. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला, इतर कागदपत्रेही मी गोळा केली आहे, आता प्रवेश मिळाला नाही तर मुलीचे शैक्षणिक नुकसान होईल, असे डंभारे यांनी प्राचार्यांना सांगितले. पण, कठोर मनाच्या अधिकार्‍याच्या हृदयाला पाझर फुटला नाही. त्यामुळे अतुल डंभारे व त्यांच्या मुलीच्या अडचणी वाढल्या आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनी कारवाई करावी, अशी मागणी अतुल डंभारे यांनी केली आहे.
 
जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथे सहाव्या वर्गात ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशाची यादी दिल्ली येथून येते. काही कारणास्तव निवड झालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास किंवा प्रवेश घेतल्यावर प्रवेश रद्द केल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. अशीच प्रतीक्षा यादीत अतुल डंभारे यांची मुलगी दुसर्‍या स्थानी होती. त्यामुळे त्यांनाही कॉल करण्यात आला. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचे प्रमाणपत्र आदी काढण्यासाठी आम्ही त्यांना सांगितले नव्हते, अशी प्रतिक्रीया प्राचार्य शैलेश नागदेवे यांनी दिली.