भंडारा
abhijit-gokhale : स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे केलेले भाषण हिंदूत्वाची कार्यसूची म्हणजेच अजेंडा होता. तर डॉ. हेडगेवारांनी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना म्हणजे हिंदूत्वाचा कृती आराखडा म्हणता येईल. आज शंभर वर्षाच्या कालावधीत संघाने जे साध्य केले, ते अनूकलतेच्या जोरावर! आज समाज सोबत यायला तयार आहे. त्यामुळे समाजाला सोबत घेऊन प्रामाणिकपणे देशहिताचे कोणतेही कार्य करा, ते संघकार्य ठरेल, असे मत संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा नगराचा श्री विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव येथील स्प्रिंगडेल शाळेच्या मैदानावर घेतला गेला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अभिजित गोखले बोलत होते.

व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजदीप चौधरी, जिल्हा सहसंघचालक अनिल मेहर, नगर संघचालक पंकज हाडगे उपस्थित होते. मान्यवर अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. प्रास्ताविक आणि पाहूण्यांचा परिचय पंकज हाडगे यांनी केला. प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना, डॉ. राजदीप चौधरी म्हणाले लहानपणापासून संघाबद्दल माझी धारणा वेगळी होती. मात्र सार्वजनिक जीवनात काम करताना आलेल्या अनूभवातून ती बदलली. निस्वार्थ भावनेतून संघ सेवा करतो, हे वेगवेगळ्या प्रसंगातून मी अनूभवले. समाजात जे सकारात्मक बदल संघ घडवू इच्छितो त्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. संघाचे विचार जीवनात नक्की बदल घडवून आणू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे संबोधित करताना प्रमुख वक्ते अभिजीत गोखले म्हणाले, शंभर वर्ष झाली म्हणून संघ स्वयंसेवकाला निवांत बसायचे नाही. पुढेही आव्हाने येतील त्यासाठी तयार रहायचे आहे. शंभर वर्षाच्या काळात संघाच्या काही उपलब्धी आहेत. संघाची ही यात्रा अनेक संकटे, बाधा येऊनही अखंडीत सुरू आहे, ही पहीली उपलब्धी. संघानेच सामान्य व्यक्तीला रोज देशासाठी जगण्याचे मूल्य शिकविले. संघाची शाखा याचे माध्यम ठरले. सर्व सेवाकार्यात संघाची भूमिका महत्वाची आहे. समाजाच्या आवश्यकतेनुसार सेवाकार्याचे जाळे निर्माण करून सेवेचा लाभ घेणाèयांना इतरांना सेवादेण्यासाठी सज्ज करण्याची किमया संघानेच करून दाखविली आहे.
संघटनात्मक व सामाजिक जीवनात जी मूल्य स्थापन करावी लागतात ती संघाने केली. शंभर वर्षात केलेल्या अनेक परिवर्तनाच्या गोष्टींमुळे आज अनुकूलता आली आहे. समाज सोबत यायला तयार आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे देशहिताचे कोणतेही कार्य हाती घेऊन स्वयंसेवक असो की सामान्य नागरिक प्रत्येकाने या संघकार्यात स्वतःचे योगदान द्यावे, असेही अभिजीत गोखले म्हणाले. उत्सवाला शिकागो येथील हिंदू स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक श्रीधर दामले, तालुका संघचालक राजेंद्र कहू, आ. परिणय फुके, माजी खा. सुनिल मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते.
उत्सवापुर्वी शहरातून गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन काढण्यात आले. पथसंचलन आणि उत्सवादरम्यान पूर्णवेळ पाऊस पडत होता. मात्र स्वयंसेवकांनी भर पावसात शिस्तीचा परिचय दिला.