सिंदी
damage cotton crops सततच्या नापिकी आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे बळीराजा आधीच आर्थिक संकटात असताना या भागातील अनेक कपाशीच्या शेतात रानडुकरांनी हैदोस घातला. रानडुकरांनी पिकात हैदोस घालून पिकं जमिनीवर लोळवले. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडला आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्यांच्या शेतजमिनीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संततधार पावसामुळे सोयाबीनचे पीक कोमात गेले. आता सोयाबीनला शेंगा धरल्यानंतर त्यावर यलो मोझॅक आणि चारकोल रॉटने आक्रमण केले. किमान पांढरे सोने हाती लागेल, या आशेने शेतकर्यांनी कापसाच्या पिकावर वारेमाप खर्च केला. परंतु, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीला फुल आणि पात्यांचे प्रमाण कमी प्रमाणात दिसत आहे. थोड्याफार प्रमाणात कपाशीची बोंड फुटतील आणि मुद्दल का होईना, रोख रकम हाती येईल, अशी अपेक्षा आहे. परंतु, गत पंधरवड्यात या भागात रानडुकरांनी कपाशीच्या अनेक शेतात हैदोस घातला आहे. रानडुकरांनी कापसाची बोंडं खाताना पिकांचेही नुकसान केल्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाला आहे. त्यामुळे आता सीतादहीचा कापूस घरी येईल की नाही? या चिंतेत कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहे.
मौजा कवठा येथील राजू सोनटके, परसोडी शिवारातील गणपत कोपरकर आणि अरुण झाडे यांच्या कपाशीच्या पिकात रात्री रानडुकरांनी सरासरी तीन-चार एकरातील पीक फस्त केले. झाडांची मोडतोड करून ढीग शेतभर पसरल्याचे दिसून येत आहे. पिकांचे नुकसान पाहून शेतकरी चांगलाच चिंताक्रांत झाला आहे. वनविभागाच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.