दार्जिलिंगमध्ये भूस्खलनात आतापर्यंत २३ ठार; शेकडो पर्यटक अडकले

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
दार्जिलिंग,
23-dead-in-darjeeling पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि मिरिक टेकड्यांवर रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. या मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा तब्बल २३ वर पोहोचला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली, रस्ते वाहून गेले आणि वाहतुकीचा पूर्णत: खोळंबा झाला आहे. काही दुर्गम गावे बाहेरील जगाशी तुटली असून शेकडो पर्यटक टेकड्यांमध्ये अडकले आहेत.
 
 

23-dead-in-darjeeling 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज बाधित भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत आणि भरपाई देण्याची घोषणा केली असून, त्याबाबतची रक्कम लवकरच निश्चित केली जाणार आहे. एनडीआरएफ, दार्जिलिंग आणि जलपाईगुडी जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, सरसाली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धार गाव (मेची), नागरकाटा आणि मिरिक तलाव परिसर या ठिकाणी सर्वाधिक हानी झाल्याची नोंद आहे.
नागरकाटा येथे स्वतंत्र बचाव मोहिमेदरम्यान भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत दार्जिलिंग, मिरिक आणि जलपाईगुडी जिल्ह्यांत मिळून एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर बंगाल विकास मंत्री उदयन गुहा यांनी ही घटना अत्यंत दुःखद असल्याचे सांगत परिस्थिती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती दिली. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. गोरखालँड टेरिटोरियल अॅडमिनिस्ट्रेशनचे (जीटीए) सीईओ अनित थापा यांनीही पुष्टी केली की, “टेकड्यांची राणी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटनस्थळी तब्बल ३५ ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
 
मिरिक परिसरात सर्वाधिक हानी झाली असून, तेथे ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सात जखमींना वाचवण्यात आले आहे. दार्जिलिंगमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, स्थानिक पोलिस, प्रशासन आणि आपत्ती प्रतिसाद पथके रात्रंदिवस बचाव कार्यात गुंतली आहेत. नागरकाट्यातील बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले असून, आणखी काहीजण अडकले असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले. त्यांनी राज्य प्रशासनाशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दार्जिलिंगमध्ये सध्या दुर्गापूजेनंतरच्या उत्सवांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. मुसळधार पावसामुळे मिरिक, घूम, लेपचाजगत आदी भागात हे पर्यटक अडकले आहेत. काही भागांमध्ये बचाव कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी सैन्य आणि हेलिकॉप्टरच्या मदतीचा विचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.