गोंदिया,
Adivasi protest Gondia राज्यातील बंजारा, धनगर व अन्य समाज त्यांचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून त्यांना आदिवासी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणत आहे. या निषेधार्थ, संयुक्त आदिवासी कृती समिती आणि समन्वय समितीच्या नेतृत्वात शहरात आज, 6 ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजाचा आक्रोष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 50 हजारापेक्षा जास्त आदिवासी बांधव सहभागी झाल्याचे चित्र होते.
हैदराबाद राजपत्रानुसार, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा संभाव्य निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, बंजारा समाज इतर जातींसह, बंजारा, धनगर आणि इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणत आहे. आदिवासी समाजाकडून याला विरोध केला जात आहे. याच्या निषेधार्थ व आदिवासींच्या आरक्षणाच्या रक्षण करण्यासाठी संयुक्त आदिवासी कृती समिती आणि समन्वय समितीच्या नेतृत्वात 6 ऑक्टोबर रोजी शहरात आक्रोष मोर्चा काढण्यात आला. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर सकाळी 9 वाजल्यापासून मोठ्या संख्येने आदिवासी समुदाय जमू लागला व दुपारी 12 वाजतापर्यंत ते हळूहळू मोठ्या गर्दीत रूपांतरित झाले. प्रसंगी आदिवासी नेत्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर इंदिरा गांधी स्टेडियमपासून जिल्हा दंडाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शांततापूर्ण आणि संवैधानिक पद्धतीने घोषणा देत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामसेर जाहीर सभेत रूपांतरीत झाला. यावेळी आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हा दंडाधिकार्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. चौकट...आदिवासी समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्य रस्त्यांवरील दारू आणि दारूची दुकाने बंद होती. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून ज्या मार्गाने मोर्चा आयोजित होता तेथील दुकाने बंद ठेवले होते. या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले होते. तसेच मोर्चा व सभेदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.