मुंबई,
ananadacha shidha yojana राज्यातील नागरिकांना गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा आनंद यंदा मिळणार नाही. आर्थिक अडचणींमुळे ही योजना थांबवण्यात आली असून, ती कायमस्वरूपी बंद केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती. गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदात साजरे करता यावेत, या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली होती. पण आता आर्थिक संकटामुळे दिवाळीतही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळांनी दिलेल्या वक्तव्याने चर्चेला ऊत आला आहे.
पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “गणपती आणि दिवाळीच्या काळात आनंदाचा शिधा मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला होता. पण वित्त विभागाने शक्य नसल्याचं सांगितलं. एका आनंदाचा शिध्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा खर्च येतो. मला असं वाटतं की हा लाडकी बहीण योजनेचा फटका आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठीच तब्बल ४० ते ४५ हजार कोटी रुपये लागतात. त्यामुळे आनंदाच्या शिध्याला कात्री लागली असावी, असे भुजबळांनी स्पष्ट सांगितले. ananadacha shidha yojana त्यांनी पुढे सांगितले की, शिवभोजन थाळी योजनेसाठीही निधीची टंचाई आहे. वर्षभरासाठी सुमारे १४० कोटी रुपयांची गरज असते, पण आत्तापर्यंत फक्त ७० कोटींचीच मंजुरी मिळाली आहे. कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली. दादाही (अजित पवार) म्हणाले की पैशांचं सोंग घेता येत नाही. सर्व मंत्र्यांच्या गाड्या विकल्या तरी निधी निर्माण होणार नाही,” अशी टीका भुजबळांनी केली.
राज्यातील अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि आर्थिक मर्यादा यांमुळे सरकारकडून विविध योजनांवर आळा घातला गेला आहे. मागील काही महिन्यांतील अतिवृष्टीमुळे सुमारे ६० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली असून, लाखो शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे या परिस्थितीत ‘आनंदाचा शिधा’ योजनेतून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळी अगदी दोन आठवड्यांवर येऊन ठेपली असतानाही शिध्यावाटपाची कोणतीही हालचाल सरकारने सुरू केलेली नाही. पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची परंपरा सुरू केली होती. मात्र, आता आर्थिक तुटवड्याच्या सावटाखाली ही योजना इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.