नागपूर,
octave भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शनात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थ-ईस्ट फेस्टिवल "ऑक्टेव्ह" चे भव्य आयोजन 9 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान नागपूरमध्ये केले जाणार आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या प्रांगणात होणा-या या सांस्कृतिक महोत्सवात पूर्वोत्तर भारतातील 223 कलाकार त्यांच्या अद्वितीय सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे पूर्वोत्तरच्या समृद्ध परंपरा आणि कलांचा अनुभव प्रेक्षकांना देतील.
पूर्वोत्तर भारतातील आठ राज्ये जसे, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्किम आणि त्रिपुरा यांची पारंपरिक संस्कृती जतन करणे, संवर्धन करणे आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे देशाच्या विविध भागात आयोजित होणाऱ्या या ऑक्टेव्ह फेस्टिवलचा उद्देश भारताची सांस्कृतिक वैविधता व्यापक स्तरावर सादर करणे हा आहे, अशी माहिती दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या चार दिवसीय महोत्सवाचे कार्यक्रमाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता गणमान्य अतिथींच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर पारंपरिक पोशाख शो व लोकनृत्याचे सादरीकरण होणार आहे. 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज संध्याकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान सांस्कृतिक संध्येचे आयोजन करण्यात येणार असून त्यात बिहू, बारदोई सिकला, होजागिरी, संग्राई मोग, सिंगी छाम, नागा वार नृत्य, काशाद मस्ती, वांगला नृत्य, चेराव नृत्य, पुंग ढोल चोलम, थांगता व चेरोल जोगोई, जूजू जाजा, मणीपुरी रास, सत्रिया नृत्य यांचा समावेश आहे.
विशेष “बांबू शिल्प कार्यशाळा”
पूर्वोत्तर भारतात बांबूचा उपयोग घर बांधणी, हस्तशिल्प, संगीत वाद्ये (झांझ, फ्लूट इ.) आणि पारंपरिक उत्सवात केला जातो. येथील बांबूच्या उत्पादनांना स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज बांबू शिल्प कार्यशाळा आयोजित केली जाणार असून पूर्वोत्तर भारतातील कुशल कलाकार बांबू पासून विविध शिल्पकृती कशा तयार करायच्या याचे मार्गदर्शन करतील.
हस्तशिल्प स्टॉल
पूर्वोत्तर राज्यांतील आकर्षक आणि उपयोगी हस्तशिल्प प्रदर्शित केले जातील. त्यात, बांबूचे फर्निचर, बास्केट, सजावटी वस्तू, घरगुती साहित्य, लाकूड आणि दगडाचे शिल्प, पारंपरिक कपडे व टेक्सटाईल्स, मातीचे शिल्प, जनजातीय पारंपरिक दागिने इत्यादीचा समावेश राहील. हा मेळा दररोज दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुला राहील.
हे सर्व कार्यक्रम नि:शुल्क असतील.octave दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे संचालक श्री फुरकान खान यांनी नागपूर व आसपासच्या नागरिकांना या भव्य उत्सवात उपस्थित राहून पूर्वोत्तर भारताची सांस्कृतिक वैविध्य आणि परंपरा अनुभवण्याचे आवाहन केले आहे.
विस्तृत कार्यक्रम
• 9 ऑक्टोबर: उद्घाटन, पारंपरिक पोशाख शो आणि लोकनृत्य
• 10 ऑक्टोबर: लोकनृत्य आणि पारंपरिक पोशाख शो
• 11 ऑक्टोबर: शास्त्रीय मणिपुरी रास नृत्य, सतरिया नृत्य आणि लोकनृत्य
• 12 ऑक्टोबर: सतरिया नृत्य, लोकनृत्य आणि रॉक बँड
पत्रकार परिषदेत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर चे भूपेंद्र सिंग कोठारी, सी. एल. साळवी, हेमंत मेहता यांची उपस्थिती होती.