इटली,
road accident दक्षिण इटलीतील मटेऱा (Matera) शहरात घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात चार भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोम येथील भारतीय दूतावासाने सोमवारी याबाबत माहिती देत या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
इटलीतील प्रमुख बातमी संस्था एएनएसए (ANSA) ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मटेऱा शहरातील स्कानझानो जोनिको (Scanzano Jonico) नगरपालिका हद्दीत घडला. या भागातून जाणाऱ्या एग्री व्हॅलीमध्ये एक कार ट्रकला जाऊन धडकली. अपघात इतका जबरदस्त होता की कारमधील चारही भारतीय नागरिकांचा जागीच मृत्यू झाला.मृतांची ओळख पुढीलप्रमाणे पटली आहे — मनोज कुमार (३४), सुरजीत सिंग (३३), हरविंदर सिंग (३१) आणि जसकरण सिंग (२०). हे सर्व भारतीय नागरिक दक्षिण इटलीतील शेती आणि औद्योगिक भागात काम करत होते, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “दक्षिण इटलीतील मटेऱा येथे झालेल्या रस्ते अपघातात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.”दूतावासाने यासोबतच हेही स्पष्ट केले आहे की, स्थानिक इटालियन अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहून अपघाताची सविस्तर माहिती घेतली जात आहे. तसेच, पीडितांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी दूतावासीन मदत देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या अपघातात आणखी सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील पाच जणांना मटेऱामधील पोलिकोरो (Policoro) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एक गंभीर जखमी व्यक्तीला पोटेंझा (Potenza) येथील सान कार्लो (San Carlo) रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हा अपघात नेमका कसा घडला, याची चौकशी सुरू असून स्थानिक वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणा यावर काम करत आहेत. इटलीत कामासाठी गेलेल्या भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर या घटनेनंतर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.