कारंजा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षीत

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
karanja mayors नगर परिषद व नगर पंचायतींसाठी नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागात मंत्रालय, मुंबई येथे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची राज्यस्तरीय सोडत ६ ऑटोबरला पार पडली. या सोडतीत कारंजा नगर परिषद नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्ग घोषित झाली असून, या निर्णयामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
 

कारंजा मेयर  
 
 
राज्यभरातील सर्व नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी मंत्रालयात सोडत कार्यक्रम घेण्यात आला. नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांचे मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीत संगणकीकृत सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान संपूर्ण पारदर्शकतेचे पालन करण्यात आले. गेल्या पंचवार्षिकला नगराध्यक्ष पद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे यंदा ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील अनेक इच्छुकांनी मोठी तयारी सुरू केली होती. मात्र या वेळी जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी घोषित झाल्याने एकीकडे त्या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरले तर दुसरीकडे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातील इच्छुकांसाठी ही सोडत मोठा दिलासा ठरली आहे. दीर्घकाळानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी संधी उपलब्ध झाली असून शहराच्या विकासासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया काही इच्छुकांनी व्यक्त केली.
सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे आता कारंजा नगर परिषद निवडणुकीत नवे चेहरे, आणि तरुण महिला कार्यकर्ते मैदानात उतरण्याची शयता आहे.karanja mayors कारंजा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलासाठी राखीव निघाल्याने राजकीय वातावरण तापायला लागले असून, अनेक जणांनी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.त्यामुळे उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींची मोठी दमछाक होणार असून, अनेकांची नाराजी पत्करावी लागणार आहे.
वाशीम, मंगरुळनाथ ओबीसी सर्वसाधारण
वाशीम जिल्ह्यात मुदत संपलेल्या नगर परिषदा आरक्षण सोडत ६ ऑटोबर रोजी काढण्यात आली असून, त्यामध्ये वाशीम व मंगरुळनाथ नगर परिषदेचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) सर्वसाधारण निघाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सर्वसाधारण आरक्षणामुळे महिला आणि पुरुष यापैकी कोणीही निवडणुक लढवू शकतो. त्यामुळे पुरुषाबरोबर महिलांही नगरध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याने यावेळी ही निवडणुक अत्यंत चुरशीची होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील व इतर जातीतील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.