नवी दिल्ली,
Students will learn history of RSS राजर्षि टंडन मुक्त विद्यापीठाने (मुविवि) आपल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सत्यकाम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, भारतीय ज्ञान परंपरेचे संवर्धन आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
प्रोफेसर सत्यकाम यांच्या मते, आरएसएस फक्त धार्मिक किंवा तात्विक विचारधारेपुरते मर्यादित नाही; त्यात सामाजिक, नैतिक आणि राजकीय मूल्यांचा समावेश आहे. संघ वसुधैव कुटुंबकम्, सहिष्णुता, विविधता, आत्मनिर्भरता आणि स्वदेशी उत्पादनांच्या प्रोत्साहनावर भर देतो. याच भावनेला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी संघाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट केला जात आहे.
कुलगुरू प्रोफेसर सत्यकाम यांनी हेही सांगितले की, संघाचे स्वयंसेवक आपत्कालीन परिस्थितींमध्ये समाजासाठी पुढच्या रांगेत उभे राहतात आणि मदत करतात. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत होईल, भारतीय जीवनशैलीच्या पारंपरिक मूल्यांचा सन्मान वाढेल आणि समाजातील मानवी मूल्यांचा विकास होण्यास मदत होईल. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी केली असल्याची माहिती दिली आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने युवकांना प्रेरित करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल असे सांगितले.