गोंदिया,
unseasonal rain damage, आठवडाभरपासून परतीचा पाऊस जिल्ह्यात ठाण मांडून आहे. अनेक ठिकाणी झालेल्या वादळी पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी येणार्या पिकांची माती केली आहे. हवामान विभागाच्या अंदानुसार यंदा पावसाळा लांबणार असल्याने धान उत्पादक चांगलाच धास्तावला आहे.
यावर्षी पावसाळ्याला उशिरानेच सुरूवात झाली. अनेक शेतकर्यांनी विहिरी, कुपनलीकेतील पाण्याचा उपसा करून धान नर्सरी टाकल्या. जूनमध्ये सरासरीच्या केवळ 58 टक्केच पाऊस झाला. जूनमधिल उनिव जुलैमध्ये भरून निघाली. जुलेमध्ये सरासरीच्या तब्बल 144 टक्के पाऊस झाला. या महिन्यात काही भागांत दोनतीनदा अतिवृष्टीची नोंद झाली. पुर परिस्थित निर्माण होऊन पिक, घरे, गोठे, प्राणी व मानवहाणी झाली. ऑगस्टमध्ये पावसाने धोका दिला. काही भागात धान लागवड रखडली. जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे धान लागवड पुर्णत्वस आली. सप्टेंबरमध्ये सुरवातीपासूनच सातत्याने पाऊस बरसत राहिला. या महिन्यात सरासरीच्या 126 टक्के पाऊस झाला. सध्या कमी कालावधीचे धान कापणीसाठी आले आहेत. मध्यम कालावधीच्या धान वाणांनी ओंबी टाकली तर अधिक कालावधीचे धान वाण गर्भावस्थेत आहेत. मागील आठवडाभरपासून परतीचा पाऊस जिल्ह्यात ठाण मांडून आहे. अनके भागांत झालेल्या वादळी पावसाने धानाला लोळविले आहे. या पावसाने धान शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ज्या धान शेतीचे नुकसान झाले आहे त्या शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, या अपेक्षेत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. आताही पावसाने जिल्ह्यातून माघार न घेतल्याने वादळी पावसाच्या तावडीतून सुटलेले धान पीक घरी येईल की नाही, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. जिल्ह्यात बहुतांश शेती वरकस (निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून) आहे. या जमिनीतून फक्त खरीप हंगामात पडणार्या पावसावर धानाचे उत्पादन घेतले जाते. या जमिनीतील पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. मात्र सातत्याने पडणार्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आता पावसाने माघार घ्यावी अशी ईश्वराला शेतकरी प्रार्थना करत आहे. मात्र यंदा पावसाळा लांबणार असल्याचे भाकीत प्रादेशिक वेध शाळेने वर्तविल्याने धान उत्पादक चांगलाच धास्तावला आहे.