तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Vivek Bidwai राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत वाढलेल्या लोकांनी देशासाठी काम करायचे ठरविले असून राम जन्मभूमीतच 500 वर्षांनंतर राम मंदिर बांधले असून या देशात पाच परिवर्तन करावयाचे ठरविले आहे. हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे लोक सत्तेवर असल्याचा अभिमान असून भारत विश्वगुरूच्या परमवैभवावर उभा असल्याचे प्रतिपादन विवेक बिडवई यांनी केले.
स्थानिक नगर पालिका प्रांगणात रविवार, 5 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलन व शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून विदर्भ प्रांत गोसेवा आयोजक बिडवई बोलत होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक लांडगे, जिल्हा कार्यवाह आशिष प्रतापवार, तालुका संघचालक संजय फटाले, नगर संघचालक अनिरुद्ध मुक्कावार उपस्थित होते. पुढे बोलताना विवेक बिडवई म्हणाले, 1925 पासून आतापर्यंत संघाने निष्ठेने हिंदुत्वासाठी कार्य केले. डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असून संघाचा शताब्दी सोहळा साजरा करताना आनंद होत आहे.
देशात आता संघाची शाखा नाही, असे एकही खेडेगाव नाही. या ठिकाणी स्वयंसेवक अग्रेसर होऊन कार्य करतो. हिंदुत्व व संघ विचारसरणीच्या 36 विविध संघटना आहेत. त्या संघटना आपापल्या स्तरावर काम करतात. 32 देशांत संघाच्या शाखा लागतात. तर 60 च्या वर देशांत संघाचं काम सुरू आहे. देशासाठी काम करणारे स्वयंसेवक संघाने निर्माण केले आहेत, असेही ते म्हणाले.
सामाजिक समरसतेच्या माध्यमातून समता प्रस्थापित झाली पाहिजे. उच्चनीचता नष्ट झाली पाहिजे. एक स्मशान, एक मंदिर आणि एक पाणवठा ही संकल्पना निर्माण झाली पाहिजे अनुशासित समाज असायला हवा, नागरी शिष्टाचार पाळला तर समाजाची प्रगती निश्चित आहे. त्यामधून परिवर्तन शक्य असल्याचे विवेक बिडवई यांनी यावेळी सांगितले.