मुंबई,
Yellow alert in Maharashtra महाराष्ट्रात पुन्हा एकदा आकाशात काळे ढग जमू लागले आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘शक्ती’ नावाचे चक्रीवादळ हळूहळू तीव्र होत असून, त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागांवर दिसू लागला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील चार दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला. विशेषतः मराठवाड्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये शेतं पाण्याखाली गेली, वाहतुकीवर परिणाम झाला. ही स्थिती स्थिरावत असतानाच, आता पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार झालं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाड्यात पावसाचे संकेत आहेत.
आज नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट आहे, तर परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना आणि धुळे या जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ७ ऑक्टोबर रोजीही पावसाची तीव्रता कमी न होता पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Yellow alert in Maharashtra या दिवशी मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ८ ऑक्टोबरला रत्नागिरी, सातारा, सांगली आणि परभणी जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या सरी पडतील. ९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की, पुढील २४ तासांमध्ये राज्याच्या मध्य आणि मराठवाडा विभागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह सरी येतील. सातारा, सांगली आणि सोलापूर परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी असेल, पण काही ठिकाणी रिमझिम सरींची शक्यता हवामान खात्याने नाकारलेली नाही. विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण थोडं जास्त राहणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये अधूनमधून हलक्या सरी पडतील. काही भागांत सूर्यकिरणांची हजेरी असेल, तर काही ठिकाणी क्षणात ढग दाटून येऊन सरी बरसतील. हवामान विभागाच्या मते, हे चक्रीवादळ पुढील काही तासांत पश्चिम-मध्य अरबी समुद्रात सरकणार असून, नंतर पूर्व-ईशान्य दिशेला वळून हळूहळू कमकुवत होईल. या वादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नसला तरीही, किनारपट्टी भागात आणि समुद्रकिनाऱ्यांवर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस आणि ऊन यांचं मिश्र वातावरण राहील. काही भागांमध्ये उघडीप मिळाल्यामुळे तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.