नागपुरात दूषित कफ सिरपमुळे १९ बालकांचा मृत्यू
चौकशीसाठी एनसीडीसी टीम नागपूरला येणार
दिनांक :07-Oct-2025
Total Views |
नागपूर,
19 children die in Nagpur मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील निरागस बालकांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दूषित कोल्ड्रिफ कफ सिरपचे सेवन केल्यानंतर उपचार घेत असलेल्या तब्बल १३ बालकांचा नागपूरमध्ये मृत्यू झाला असून, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मिळून मृत्यूचा आकडा १९ वर पोहोचला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याची अधिकृत पुष्टी केली आहे. छिंदवाडा जिल्ह्यात काही लहान मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तत्काळ नागपूरमधील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे या बालकांनी प्राण गमावले. नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बालकांना दूषित सिरपचे सेवन झालेले नाही, मात्र मध्य प्रदेशातून दाखल झालेल्या रुग्णांमध्ये या सिरपचा दुष्परिणाम स्पष्ट दिसून आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या नमुन्यांमध्ये डायएथिलिन ग्लाइकॉल या विषारी रासायनिक घटकाचे प्रमाण अत्याधिक आढळले आहे. हा घटक सामान्यतः औद्योगिक उत्पादने तयार करण्यासाठी वापरला जातो आणि तो मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरतो. विशेषतः लहान मुलांच्या किडनीवर या रसायनाचा गंभीर परिणाम होऊन मल्टिपल ऑर्गन फेल्युअरची स्थिती निर्माण होते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनांमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खळबळ उडाली असून, दोन्ही राज्य सरकारांनी तत्काळ या सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थाने देशातील सहा राज्यांतील संबंधित औषधनिर्मिती कंपन्यांवर छापेमारी आणि तपास सुरू केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्लीची विशेष टीम लवकरच नागपूरमध्ये दाखल होणार आहे, अशी माहिती डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. नागपूरमध्ये सध्या आरोग्य विभाग सतर्क असून, या प्रकरणाशी संबंधित सर्व नमुने तपासणीसाठी दिल्ली व पुणे येथील प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पीडित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, देशभरातून या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.