मूर्तींची विटंबना थांबविण्यासाठी ‘हम हैं न हमें दीजिए’

-तेजस्विनी मंचचे कृतीशील जनजागृती अभियान -धार्मिक साहित्य संकलन करून सन्मानपूर्वक विल्हेवाट

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
पराग मगर
नागपूर,
nagpur-news : दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर अनेक मंदिरांच्या आवारात, झाडांभाेवताल लक्ष्मीच्या मूर्ती तसेच जुन्या धार्मिक पाेथ्या, पुस्तके, देवांच्या मूर्ती, फोटाे, वस्त्र आदी साहित्य बेवारसपणे नजरेस पडते. हे थांबविण्यासाठी तेजस्विनी मंचच्या महिलांनी संकलन माेहीम 2019 पासून हाती घेतली असून या संकलित साहित्याचे सन्मानपूर्वक विघटन आणि विल्हेेवाट करण्यासाठी हम ‘हैं न हमें दीजिए’ या अभियानाखाली त्यांचे प्रयत्न सुरू आहे.
 
 
 
lakshmi-murti
 
 
 
या प्रयत्नांविषयी तेजस्विनी मंचच्या किरण मुंदडा सांगतात, माझ्यासह काही मैत्रिणी स्वच्छता अभियानाशी जुळलेलाे असताना धार्मिक सामग्री आणि त्यातही लक्ष्मीच्या मूर्ती माेठ्या प्रमाणात दिसायच्या. यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करणे आवश्यक हाेते. 2019 च्या सुरुवातीला आम्ही शहरातील बराच भाग फिरून जिथे जिथे मूर्ती मिळतात त्या संकलित केल्या. पण त्या पीओपीच्या असल्याने पाण्यात विसर्जन शक्य नव्हते. यातील जाणकारांनी साेडियम बाय कार्बाेनेट टाकून या मूर्तीचे विघटन शक्य असल्याचे सांगितले. त्यावेळी प्रथमच 250 मूर्तींचे आम्ही सन्मानपूर्वक विसर्जन केले.
 
 
परंतु विविध धार्मिक साहित्याचा आणि त्यासाेबत जुळलेल्या श्रद्धेचाही प्रश्न हाेता. त्यामुळे नंतर आम्ही धर्मरक्षा रथ उभारून साहित्य संकलन सुरू केले. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता आम्ही विशिष्ट कालावधीकरिता पूर्व नागपुरात गांधीबाग बगीचा, डाॅ. आंबेडकर उद्यान, सरजू टाऊन(वाठाेडा), हनुमान मंदिर(भंडारा राेड), शीतला माता मंदिर(क्वेटा काॅलनी), हनुमान मंदिर दुर्गा नगर(मानेवाडा) तर पश्चिम नागपुरात हनुमान मंदिर(टेकडी राेड), खंडाेबा मंदिर(काॅटन मार्केट), शिवाजीनगर उद्यान, दगडी पार्क(रामदासपेठ), सिद्घ हनुमान मंदिर(लक्ष्मीनगर), शिव मंदिर(मानकापूर), सुर्वेनगर उद्यान, दुर्गा मंदिर(छावनी), गाैरक्षण सभा(धंताेली) या 15 संकलन केंद्रांवर मूर्ती व साहित्य संकलित करताे. विशेष म्हणजे यासाठी एकही रुपया आम्ही कुणाकडून घेत नसल्याचे मुंदडा सांगतात.
 
 
गतवर्षी तब्बल 40 हजारावर मूर्तींचे विसर्जन
 
 
किरण मुंदडा सांगतात गेल्या वर्षी आम्हाला विविध प्रकारच्या संकलनातून 40 हजारावर मूर्ती प्राप्त झाल्या. इतक्या मूर्तींचे विघटनात्मक विसर्जन कुठे करायचे हा प्रश्न हाेता. परंतु सामाजिक जाण ठेवून आमच्याशी जुळलेल्या एका कार्यकर्त्यांनी महासांवंगी येथे त्यांच्या शेताचा काही भागच यासाठी दिला. त्यात या मूर्तींचे साेडियम बाय कार्बाेनेटच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने आम्ही विसर्जन केल्याचे मुंदडा सांगतात. त्यांच्या 100 महिला सहकारी या विधायक कार्याशी जळल्या आहेत.
 
 
प्रतिक्रिया
 
 
लक्ष्मीचे विसर्जन केल्यास लक्ष्मी हातून जाईल अशा मानसिकतेून लाेक खंडित झालेल्या मूर्ती मंदिरांपाशी आणून टाकतात. अशाने त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न हाेईल का हा प्रश्न आम्हाला पडताे. पण या अभियानातून धार्मिक साहित्य आम्हाला देण्याचे प्रमाण वाढत आहे. लाेकांनी धार्मिक साहित्य कुठेही टाकू नये यासाठी जनजागृती आम्ही करीत आहाेत.
किरण मुंदडा
अध्यक्ष, तेजस्विनी मंच