विदेशात एमबीबीएसच्या नावावर काेट्यवधीने फसवणूक

- नागपुरातील मास्टरमाईंडचे देशभरात रॅकेट सक्रिय

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
MBBS abroad scams : बारावीत कमी गुण मिळालेल्या आणि डाॅक्टर हाेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या देशात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून काेट्यवधीने फसवणूक करणारी टाेळी नागपुरात सक्रिय आहे. ही टाेळी विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक करीत असून त्या टाेळीविरुद्ध सक्करदरा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल रमेशराव इंगाेले, व्यंकट रेड्डी (रा. भानू टाॅवर इरागुडा, हैदराबाद), उमंग पटेल (रा. अहमदाबाद, गुजरात) अशी टाेळीतील सदस्यांची नावे आहे.
 
 
 
mbbs
 
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतूल इंगाेले आणि त्याची मैत्रिण हे दाेघे या टाेळीचे मास्टरमाईंड आहेत. दोघेही संगणक आणि आयटीमध्ये तज्ञ असून बनावट डाक्युमेंट आणि ई-मेल आयडीसह बनावट संकेतस्थळ बनविण्यात पटाईत आहे. अतुल याने काेपरगाव येथील आर. जे. काॅलेजचा अमेरिकेतील काेलंबस विद्यापीठाशी सामंजस्य करार असून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाताे, अशी जाहिरात वर्तमानपत्रात प्रकाशित केली. ती जाहिरात बनावट हाेती. मात्र, ही जाहिरात वाचून समृद्धी ही तरुणी सक्करदरा येथील पिपललिंक प्लेसमेंटच्या कार्यालयात पाेचली.
 
 
त्यावेळी अतुलने व्यंकट रेड्डी हा काेलंबस विद्यापीठाचा संचालक आणि उमंग पटेल हा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याची बतावणी केली. यावर समृद्धी परातेचा विश्वास बसल्याने तिघांनी तिच्याकडून नाेंदणी, वसतीगृह, खानावळ आणि महाविद्यालयफीसच्या नावाखाली 28 लाख 60 हजार रुपये घेतले. बरेच दिवस झाले तरी प्रवेश पत्र न मिळाल्याने समृद्धीने विचारणा केली असता आराेपी शितल हिने पुढच्या तुकडीत प्रवेश मिळेल, असे सांगत समृद्धीचे वडिलांच्या खात्यावर 3 लाख रुपये परत केले. मात्र, तरीही प्रवेश मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समृद्धी परातेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी चाैघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
 
बनावट ई-मेल आणि पावत्या
 
 
अमेरिकेतील काेलंबस विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देताे, अशी बतावणी करत विद्यापीठाच्या नावाने बनावट ई मेल, आणि संकेतस्थळ बनविण्यात आले. या संकेतस्थळावर विविध माहिती देण्यात आली. तसेच शुल्क भरल्याच्या पावत्यासुद्धा बाेगस तयार करण्यात आल्या. या टाेळीने चक्क अमेरिकेतील काेलंबस विद्यापीठाच्या नावाचे बँकेत खातेसुद्धा काढले आहे. त्यामुळे या टाेळीत बँक कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याची शक्यता आहे.
 
 
राज्यभरातून तीन तक्रारी नागपुरात
 
 
या टाेळीने आतापर्यंत शेकडाे विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. मात्र, लाखाेंनी पैसे गमविणाऱ्या अनेक पालकांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केली आहे. मुंबईची चित्रा, नागपुरातील समृद्धी आणि पुण्यातील एका तरुणीने अतुल आणि त्याच्या मैत्रिणसह या टाेळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, टाेळीने अन्य राज्यातील अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी ठाणेदार प्रमाेद पाेरे यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक प्रवीण वाकडे तपास करीत आहेत.