संघशाखेतून देशभक्त व चारित्र्यवान नागरिकांची जडणघडण: दिनेश गौर

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
गोंदिया, 
Dinesh Gaur : पारतंत्र्यात असताना भारताला पूर्वीचे परमवैभव व विश्वगुरू होण्याचे ‘याची देह, याची डोळा’ पूर्ण होण्याचे स्वप्न अनेकांनी पाहिले होते. शंभर वर्षापूर्वी डॉ. केशवराव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. विपरीत परिस्थितीला सुधारण्यासाठी संघ स्वयंसेवक व्यवस्था परिवर्तनासाठी काम करीत आहेत. संघ शाखेतून अनेक क्षेत्रात देशभक्त व चारित्र्यवान नागरिक घडत आहे. त्यामुळेच त्यांनी पाहिलेले स्वप्न आज शंभर वर्षानंतर पूर्णत्वास येत असल्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे. भारताची आज परम वैभवाकडे वाटचाल सुरू असून जग भारताकडे विश्वगुरूच्या दृष्टीने बघत आहे, असे प्रतिपादन रा. स्वं. संघाचे नागपूर महानगर सहकार्यवाह दिनेश गौर यांनी केले.
 

RSS 
 
 
 
तालुक्यातील कामठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ५ ऑक्टोबर रोजी आयोजित संघाच्या विजयादशमी व शस्त्रपुजन उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. अतुल रहांगडाले, गोंदिया मंडळ संघचालक दामोदर चित्रीव व कामठा मंडळ कार्यवाह गोवर्धन भाजीपाले उपस्थित होते. दिनेश गौर पुढे म्हणाले, डॉ. हेडगेवार प्रखर देशभक्त होते. त्यांचे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे. नागपूर येथे संघ शाखेचे रोवलेले रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. या काळात संघावर अनेक संकटे आली. त्याला सामोरे जात संघशाखा विस्तारल्या असून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संघाने सात कार्यक्रमांची रचना केली आहे.
 
 
या सातही कार्यक्रमात स्वयंसेवकांनी स्वतःसह कुटूंबीय, मित्रपरिवार तसेच समाजातील प्रत्येकाला सक्रीय सहभागी व्हावे. तसेच पर्यावरण, कुटुंब व्यवस्था, व्यवस्था परिवर्तन, सामाजिक समरसता, नागरी शिष्टाचार आणि स्वदेशी जागरण हे पंचसूत्र स्वयंसेवकांनी स्वतः अंगीकारून इरतांनाही जागृत करावे, असे आवाहन गौर यांनी केले. प्रारंभी कार्यक्रमास्थळावरून संपूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी शहरातील प्रमुख मार्गाने पथसंकलन केले. संघगीत व शस्त्रपुजनानंतर यावेळी योगासन, सांघिक व्यायाम व योग प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाला परिसरातील स्वयंसेवक, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.