तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sudhir Goyal : धन सर्वच जण कमावतात; मात्र त्याचा सदुपयोग किती जण करतात, हा प्रश्न महत्वाचा आहे. मंदिरात जाऊन जप, तप करून देव कधीच मिळणार नाही. मानवसेवेत खèया ईश्वराचे दर्शन होते. आजच्या काळात समाजकार्यासाठी वेळ देणाराचा खरा महादानी आणि वंदनीय आहे, असे प्रतिपादन उज्जैन येथील अंकित ग्राम सेवाधामचे संस्थापक सुधीर गोयल यांनी केले.
येथील बालाजी लॉनमध्ये रविवार, 5 ऑक्टोबरला संध्याकाळी मोहनलाल-शांताबाई चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दहाव्या वंदन सन्मान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी येथील सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. प्रकाश नंदुरकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, 1 लाख रुपये राशी अशा वंदन सन्मानाने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापक मंगला शहा यांची कन्या डिंपल घाडगे, लीना नंदुरकर, जीवनलाल राठी उपस्थित होते.
यवतमाळ ही कर्म, धर्म आणि सेवाभूमी आहे. येथे डॉ. प्रकाश नंदुरकरांसारखे सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना राठी परिवार मोहनलाल-शांताबाई चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून वंदन करते, ही गौरवाची बाब आहे, असेही सुधीर गोयल यावेळी म्हणाले.
अध्यक्षस्थानाहून बोलताना डिंपल घाडगे यांनी, मातृ, पितृ आणि समाजऋण फेडल्याशिवाय कुणीही हे जग सोडून जाऊ नये, असे प्रतिपादन केले. कुठल्याही समाजकार्यात कुटुंबाची साथ महत्वाची असते. त्यात संयुक्त कुटुंब असेल तर कोणतेही काम पूर्णत्वास जाते, असा अनुभव घाडगे यांनी सांगितला. ‘पालवी’ ही संस्था एचआयव्ही बाधितांसाठी काम करते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी सर्वांच्या सहकार्यानेच आजपर्यंत विविध कामे करता आली. अनेक प्रकल्प राबविता आले. यात आपले योगदान काहीच नसून, ही लोकसेवा लोकांच्याच मदतीने घडत आहे, अशी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान वर्धा येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. खुशबू गोपेश मोदी यांनी डॉ. प्रकाश नंदुरकर, सुधीर गोयल आणि पालवी संस्थेला प्रत्येकी 50 हजार रुपये रोख भेट दिली. सुरुवातीस स्व. विजय देशपांडे यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा राठी परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. आलोक गुप्ता, जिव्हाळा संस्थेचे सूरज हेमके, धारशीव येथील तुळजाई प्रतिष्ठानचे शहाजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रकाश नंदुरकर यांच्या समाजकार्यावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. याचे लेखन नितीन पखाले यांनी केले, तर निर्मिती आनंद कसंबे यांनी केली. मानपत्राचे लेखन जयंत चावरे यांनी, तर वाचन प्रमोद बावीस्कर यांनी केले. प्रास्ताविक निकिता राठी यांनी केले. संचालन कमल बागडी यांनी, तर आभार सुरेश राठी यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.