समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय : आत्माराम बावस्कर

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
atmaram bavaskar राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हदगाव नगराचा विजयादशमी उत्सव रविवार, 5 ऑक्टोबर रोजी स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा येथे अत्यंत उत्साहात झाला. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने सर्व स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साह होता. संघाच्या शताब्दी प्रवासात हिंदू समाजाचे तसेच स्वयंसेवकांच्या कुटुंबियांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच संघाचा हा गौरवशाली प्रवास यशस्वी पार पडला. मात्र संघाचे कार्य हे अखंड, अविरत आणि निरंतर चालणारे असून मातृभूमीला परमवैभवशाली करण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन उत्सवाचे प्रमुख वक्ते आत्माराम बावस्कर यांनी केले.
 

bavaskar 
 
 
ते पुढे म्हणाले, डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना भारताला पुन्हा परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी केली. हिंदू समाजाने आपले स्वत्व विसरल्यामुळे परकीय आक्रमकांनी देशाचे मोठे नुकसान केले. इस्लामिक आक्रमकांनी हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. तर ब्रिटिश सत्तेने समाजात फूट पाडून परस्पर भांडणांचे वातावरण निर्माण केले. या सर्व पार्श्वभूमीवर संघाने मागील 100 वर्षांपासून समाजात एकता, समरसता आणि राष्ट्रभावना जागवण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
ते म्हणाले की, आगामी काळ अनेक आव्हानांनी भरला असला तरी समाजात एकजूट व शिस्त राखणे अत्यावश्यक आहे. संघाने मांडलेले ‘पंच परिवर्तन’ समाजपरिवर्तनाचे मार्गदर्शक सूत्र ठरेल. संपूर्ण जग आज भारताकडे आशेने पाहत आहे आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.
संघकार्य हे ईश्वरी कार्य असून त्यात स्वयंसेवक, त्यांचे परिवार, समाजातील सज्जनशक्ती तसेच माता-भगिनींचे योगदान अमूल्य आहे, असेही बावस्कर यांनी नमूद केले. उत्सवाच्या प्रारंभी हदगाव नगरातून संघाचे सघोष पथसंचलन काढण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगतज्ञ डॉ. जयश्री पवार होत्या. तर व्यासपीठावर जिल्हा कार्यवाह जगदीश तावडे होते. कार्यक्रमाला आमदार बाबुराव कोहळीकर, शिवसेना शहरप्रमुख बबन माळोदे आणि इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उत्सवात गणवेशधारी स्वयंसेवक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वातावरणात राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि शिस्तबद्धतेचा अपूर्व संगम अनुभवास आला.