तभा वृत्तसेवा
नेर,
ankush-ramgade : नेर नगरीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा स्थानिक क्रीडा संकुल येथे मोठ्या थाटात पार पडला. यावर्षी संघाचे शताब्दी वर्ष असल्याने सर्व स्वयंसेवकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. सुरवातीला शहरातील बाजारपेठ व प्रमुख मार्गाने दिमाखदार असे पथसंचलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले. त्यानंतर स्थानिक क्रीडा संकुल येथे भव्य योग व कवायती प्रात्यक्षिक पार पडले.
यावेळी मंचावर नेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा प्रशिक भोयर, विभाग कार्यवाह अंकुश रामगडे, तालुका संघचालक प्रभाकर गुल्हाने व नगर कार्यवाह डॉ. अनूप पांडे ह्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. शिल्पा भोयर यांनी उत्तम व्यक्ती तयार करणे हेच कुटुंबाचे ध्येय असून कुटुंब प्रबोधनात सुसंवाद महत्वाचा असतो, सामाजिक समरसतेचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले, असे विचार मांडले.
प्रमुख वक्ते, विभाग कार्यवाह अंकुश रामगडे यावेळी म्हणाले, मनुष्य निर्मितीमध्ये संघशाखेची भूमिका महत्वाची असून, संघावर अनेकदा बंदी आली पण संघ थांबला नाही, उलट त्याची उत्तरोत्तर प्रगती होत केली. भविष्यातही उत्तम मनुष्य निर्मितीसाठी संघ कार्यरत राहील.
यावेळी सुभाषित पंकज पजगाडे, अमृतवचन हितेश श्रुंंगारे आणि वैयक्तिक गीत श्याम ठाकरे ह्यांनी सादर केले. शंभरपेक्षा अधिक गणवेशधारी स्वयंसेवक आणि मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष नागरिक सोहळ्याला उपस्थित होते. सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले.