तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sangh Shatabdi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या विजयादशमीचा कार्यक्रम नागपुरात पार पडला. या निमित्त येथील नागपूर मार्गावरील पार्वती मोटर्स येथे सर्व धर्म, पंथातील वरिष्ठ व शहरातील गणमान्य नागरिकांना निमंत्रित करून या विजयदशमी कार्यक्रमाचे सरळ प्रक्षेपण दाखवण्यात आले.
संघाने ठरविलेल्या पंचपरिवर्तन ज्यामध्ये कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य पालन आणि स्वदेशी ह्यातील सर्वात महत्वाच्या बिंदुवर म्हणजे सामाजिक समरसता या विषयी विशेष लक्ष देऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी शिया व सुन्नी मुस्लीम, खोजा मुस्लीम, बोहरा मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन व हिंदू राष्ट्रप्रेमी बांधवांनी एकत्र बसून संघ शताब्दीनिमित्त पथसंचलन व भाषणाचा पूर्ण वेळ उपस्थित राहून आनंद घेतला.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक मोहनजी भागवतांच्या भाषण आणि त्यांनी मांडलेल्या विषयाने सर्वांनाच प्रभावित केल्याचे अनेकांनी मान्य केले. आपली प्रतिक्रिया देताना, मोहनजी भागवतांचे विचार ऐकून आम्ही भावुक झालो. सर्वांना सोबत घेऊन चालणे, हीच त्यांची भारताबद्दलची कल्पना आहे, अशी भावना निजार समदानी यांनी व्यक्त केली.
संघाला मी आत्मा समजतो, असे जफर बाँबेवाला म्हणाले. तर राष्ट्राला अखंड ठेवण्यासाठी समाजात समरसता आवश्यक आहे, असे सरदार कंवलजितसिंग व तजिंदरसिंग म्हणाले. हा सर्व भारतीयांना जोडणारा कार्यक्रम, असल्याचे राज मॅथ्यू म्हणाले. भारतात शिक्षण, सुरक्षा, समृद्धी, सन्मान यांच्यासोबत समरसता असेल तर भारत विश्वगुरू होणे दूर नाही, असे प्रतिपादन डॉ. फरहत खान यांनी केले.
यवतमाळची वेगळी परंपरा आहे, ज्यात असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम होत असतात. वर्षातून एकदा असे एकत्रीकरण झाले पाहिजे, अशी भावना डॉ. नारायण मेहरे यांनी यावेळी व्यक्त केली.
या सामाजिक समरसतेच्या निमित्ताने सर्व पंथ, धर्मांचे नागरिक एकत्र येऊन भारताच्या भविष्यातील प्रगत राष्ट्र स्वप्नाला प्रत्यक्षात आणू, ही भावना निर्माण झाली. या कार्यक्रमाचे आयोजन अजय मुंधडा, दर्शन जाजू, आनंद जैन व राजेश्वर निवल ह्यांनी केले होते.