वर्धा,
illegal sand transportation, समृद्धी महामार्गावरून वैनगंगा नदीतून अवैधरित्या उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करणार्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत वाळूसह ट्रक असा २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेलू पोलिस स्टेशन परिसरात गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे समृद्धी महामार्गावरील कोटंबा शिवारात चॅनल ४० मुंबई कॉरिडोर परिसरात नाकेबंदी केली. दरम्यान, एम. एच. ३४ बी. झेड. ३६३५ क्रमांकाचा १४ टका ट्रकला थांबवून ट्रकचालक सय्यद नईम सय्यद मोहम्मद रा. छायानगर अमरावती याला विचारपूस केली. ट्रकची पाहणी केली असता ९ ब्रास पांढरी वाळू आढळून आली. रॉयल्टीबाबत विचारले असता नसल्याचे सांगून ट्रक मालक रिजवान हुसेन रा. अमरावती याने वाळू चंद्रपूर जिल्ह्यातील मून येथील वैनगंगा नदीतून आणल्याचे सांगितले. गुन्हे शाखेने ९० हजार रुपये किमतीची वाळू व २० लाख रुपये किमतीचा ट्रक असा २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, अमोल नगराळे, मंगेश चावरे, आदींनी केली.