मुंबई
Narendra Modi मुंबई शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे आणि मुंबई मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा जवळपास १९,६५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. हे भारतातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ ठरणार असून, पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता या विमानतळात असेल. मुंबई महानगर क्षेत्रातील वाढत्या हवाई प्रवासाच्या गरजा लक्षात घेता, हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.विमानतळाच्या लोकार्पणासोबतच मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठी क्रांती घडवणाऱ्या मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचेही उद्घाटन आज झाले. या टप्प्यामुळे आरे ते कफ परेड असा थेट मेट्रो प्रवास शक्य झाला आहे. आतापर्यंत ही मेट्रो सेवा दोन टप्प्यांत म्हणजे आरे ते बीकेसी आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी कार्यरत होती. नव्याने सुरु झालेल्या अंतिम टप्प्यात नेहरू सायन्स सेंटर (विज्ञान केंद्र) पासून ते कफ परेडपर्यंतच्या ११ स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यात 'मुंबई वन' या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे आणि शॉर्ट-टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (STEP) च्या लोकार्पनाचीही घोषणा केली. मुंबई वन अॅपद्वारे शहरातील विविध सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच अॅपवर एकत्र येणार असून, प्रवाशांना एका क्लिकवर सर्व सेवा वापरणे शक्य होणार आहे.या भव्य विकासकामांच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत ब्रिटीश पंतप्रधान सर किअर स्टारमर यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग मिळणार असून, मुंबईच्या विकासाचा वेग अधिकच वाढणार आहे.