दृश्यम 3'च्या टीझरला उशीर

अजय देवगनला आता मलयाळम टीमच्या निर्णयांवर अवलंबून राहावे लागणार

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Ajay Devgn अजय देवगन यांची ‘दृश्यम’ ही हिंदी सिनेमा रसिकांसाठी एक संस्मरणीय थ्रिलर ठरली. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच, २ ऑक्टोबर रोजी ‘दृश्यम 3’चा टीझर प्रदर्शित होणार असल्याचं आधी जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, नियोजित दिवशी टीझर समोर आला नाही. सुरुवातीला यामागे पार्श्वसंगीत अपूर्ण असल्याचं सांगण्यात आलं, पण आता खरी माहिती समोर आली असून ती चाहत्यांना थोडी निराश करणारी आहे.
 

Ajay Devgn 
एका आघाडीच्या हिंदी मनोरंजन वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, केवळ पार्श्वसंगीतच नव्हे, तर या प्रकल्पाच्या भविष्यातील निर्णयांवर देखील एक वेगळी अडचण निर्माण झाली आहे. ‘दृश्यम’ ही फ्रेंचाईजी मूळतः मलयाळम भाषेतील असून तिचे निर्माते अँटोनी पेरुंबवूर आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ हे या संपूर्ण फ्रेंचाईजीच्या मालकी हक्कांचे नियंत्रण ठेवून आहेत. त्यांनी मोहनलालच्या प्रमुख भूमिकेत ‘दृश्यम 3’चा शूटिंग सप्टेंबर महिन्यातच सुरू केलं आहे. त्यानंतर लगेच चित्रपटाचा अधिकृत घोषणा करण्यात आली.
 
 
 
या पार्श्वभूमीवर, Ajay Devgn  हिंदी व्हर्जनच्या निर्मात्यांनी देखील आपली तयारी सुरू केली होती आणि २ ऑक्टोबर २०२६ ही ‘दृश्यम 3’च्या हिंदी संस्करणाची रिलीज तारीख म्हणून घोषित केली. मात्र, या गोष्टीचा मलयाळम टीमला विशेष आनंद झाला नाही. कारण, त्यांच्या मते कोणताही निर्णय परस्पर न घेता, दोन्ही बाजूंच्या सहमतीने घ्यायला हवा होता. त्यामुळेच त्यांनी काही नवीन अटी ठेवल्या आहेत. आता अजय देवगन यांच्या टीमला मलयाळम टीमच्या क्रिएटिव्ह निर्णयांचं पालन करावं लागणार आहे.हिंदी ‘दृश्यम 3’चं दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार असून डिसेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. मात्र, मूळ फ्रेंचाईजीधारकांच्या अटी मान्य केल्याशिवाय कोणतीही जाहिरात किंवा घोषणा करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.दरम्यान, अजय देवगनसाठी हे वर्ष मिश्र प्रतिसादांचं ठरलं आहे. त्यांच्या तीन चित्रपटांपैकी 'रेड 2' ही एकमेव यशस्वी ठरली. आता ‘दृश्यम 3’कडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, या प्रकल्पाचं नियंत्रण सध्या पूर्णपणे मलयाळम टीमकडे असल्याने अजय देवगन आणि हिंदी टीमला थोडीशी संयमाची भूमिका घ्यावी लागणार आहे.
 
 
 
 
चित्रपटप्रेमींसाठी ‘दृश्यम 3’ कधी प्रदर्शित होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले असून, पुढील काही महिन्यांत यासंबंधी अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता आहे.