प्रा. सुखदेव बखळे
india bhutan railways भारत-चीनमधील सीमा तणावाच्या पृष्ठभूमीवर भारताने भूतानमध्ये दोन रेल्वेमार्गांची घोषणा केली असून, या प्रकल्पांमुळे भारत आणि भूतानमधील व्यापार वाढणार आहे. त्यामुळे भूतानमधील वस्तू रेल्वेने बंदरांपर्यंत पोहोचवणे सोपे होईल; पण ही साधी बाब नाही. त्यामागे एक मोठी भारतीय रणनीती आहे. भारत सरकारच्या या पावलामुळे भारतीय लष्कराच्या धोरणात्मक क्षमताच बळकट होणार नाहीत, तर सीमेवर चीनच्या बाजूने एकतर्फी झुकलेल्या धोरणात्मक संतुलनातही बदल होईल. पहिली रेल्वे आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेव्हेलफुगपर्यंत धावेल तर दुसरी रेल्वे बोंगाईगाव ते भूतानमधील समद्रुप जोंगखारपर्यंत जाईल. दोन्ही मार्ग दक्षिण भूतानला भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडतील. चीनची सीमा तुलनेने जवळ आहे, म्हणून संरक्षणात्मक दृष्टिकोनातून ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची मानली जाते. भूतानच्या सुरक्षेची जबाबदारी भारत घेत असल्याने भारताने तेथे आपली लष्करी उपस्थिती मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सद्य:स्थितीत भूतानसह देशाच्या सीमावर्ती भागात रस्त्याने सैन्य आणि जड शस्त्रे वाहून नेण्यासाठी अनेक दिवस लागतात. अनेक ठिकाणी रस्तेच नाहीत किंवा असले तरी अत्यंत अरुंद आहेत.
मोठे लष्करी ट्रक किंवा शस्त्रे उंचावर पोहोचू शकत नाहीत. आता भूतानच्या दुर्गम भागात भारताने रेल्वे लाईन टाकण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय सैनिक, टँक, चिलखती वाहने आणि तोफखाना खूप कमी वेळेत घटनास्थळी पोहोचविता येतील. युद्धकाळात वेळेची बचत अनेकदा महत्त्वाची ठरू शकते. धोकादायक टँक आणि तोफखाना जलद तैनात करता येऊ शकतो.
लष्कराला सामान्य परिस्थितीतही भूतानसह उंचावर असलेल्या भागात दारूगोळा, इंधन आणि रेशन यासारख्या रसद साहित्य वाहतुकीस अडचणी येतात. रेल्वेच्या बांधकामामुळे जलद गतीने मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी वाहतूक करणे शक्य होईल. उदाहरणार्थ, जिथे पूर्वी डझनभर ट्रकची आवश्यकता होती, तिथे आता एक ट्रेन तीच कामे करू शकेल. या रेल्वेमार्गांद्वारे भारत आपले मुख्य युद्ध रणगाडे (टी-90 आणि अर्जुन), तोफखाना तोफा (के-9 वज्र आणि बोफोर्स), क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि हवाई संरक्षण प्रणाली भूतान-चीन सीमेवरदेखील वाहून नेऊ शकेल. यामुळे कोणत्याही अचानक हल्ल्याच्या बाबतीत चीनला जलद प्रत्युत्तर देता येईल. सिलिगुडी कॉरिडॉरची सुरक्षा मजबूत केली जाईल. ही रेल्वे कनेक्टिव्हिटी भारताला हवाई मार्गांवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापासून रोखेल. हवाई पुरवठा जलद असला तरी महाग आणि हवामानावर अवलंबून असतो. रेल्वे केवळ किफायतशीरच नाही तर एक विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करेल. हे रेल्वे नेटवर्क सिलिगुडी कॉरिडॉर (चिकन्स नेक) ची सुरक्षा मजबूत करेल. हा अरुंद मार्ग भारताच्या ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारताशी जोडतो. चीनने हा कॉरिडॉर तोडण्याची धमकी दिल्यास भारत या रेल्वेमार्गांचा वापर करून जलदगतीने सैन्य आणि शस्त्रे तैनात करू शकेल. या रेल्वे मार्गांमुळे केवळ लष्करी दृष्टिकोनातूनच नव्हे, तर भारत आणि भूतानमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध दृढ होतील. यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास वाढेल आणि चीनच्या विस्तारवादी रणनीतीला आळा बसेल.
भूतानमध्ये टाकण्यात येणाऱ्या दोन लोहमार्गांमुळे केवळ सैन्य आणि शस्त्रास्त्रांची जलद हालचाल सुलभ होणार नाही, तर या प्रदेशात भारताची धोरणात्मक स्थितीही निर्णायकपणे मजबूत होईल. हे लक्षात घेतले पाहिजे की, भूतानमध्ये भारताची उपस्थिती चीनसाठी नेहमीच एक संवेदनशील मुद्दा राहिला आहे. भूतानचे रक्षण करण्याच्या भारताच्या वारंवार प्रयत्नांबद्दल तो नेहमीच चिंतेत राहिला आहे. 2017 मध्ये चिनी सैन्याने डोकलाम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भूतानच्या वतीने चीनला आव्हान देणारे भारतीय सैन्य होते. भविष्यात पुन्हा असे तणाव निर्माण झाल्यास रेल्वेने जलद गतीने सैन्याला सीमेवर पोहोचविणे खूप सोपे होईल. देशाच्या संरक्षण व्यवस्थांमध्येही बुद्धिबळाचा आधार घेतला जात असतो. शत्रुपक्ष कुठले प्यादे कधी हलवेल आणि त्याला कसे मारायचे, याची व्यूहनीती आखली जात असते. त्याला ‘स्ट्रॅटेजिक’ व्यूहनीती म्हटले जाते. भूतानमध्ये सध्या कोणतीही रेल्वेलाईन नाही. आता भारत भूतानला रेल्वेने जोडणार आहे. त्यावर अंदाजे चार हजार कोटी रुपये खर्च केले जातील. इतक्या वर्षांनंतर हे का घडत आहे आणि त्याचा अर्थ आणि उद्देश काय आहे हे समजून घेतले पाहिजे. या रेल्वे लाईन्स कुठे बांधल्या जातील ते पाहिले पाहिजे. भूतान आणि भारताची सीमा सुमारे 700 किलोमीटर आहे. एका बाजूला भूतानची भारताशी असलेली सीमा पश्चिमेला सिक्कीममध्ये सुरू होते; पण सिक्कीमची सीमा फक्त 32 किलोमीटर आहे. त्यानंतर भूतानच्या खाली, म्हणजेच भूतानच्या दक्षिणेला पश्चिम बंगालचा दार्जिलिंग-सिलिगुडी परिसर आहे. पश्चिम बंगाल आणि भूतानची सीमा 183 किलोमीटर आहे.
त्यानंतर भूतानच्या अगदी खाली, म्हणजेच दक्षिणेला आसाम आहे. आसाम आणि भूतानची सीमा 267 किलोमीटर आहे. भूतानच्या पूर्वेला अरुणाचल प्रदेशचा तवांग परिसर आहे. भूतानची अरुणाचल प्रदेशशी असलेली सीमा 217 किलोमीटर आहे. याचा अर्थ असा की, भूतान तीन बाजूंनी भारताने वेढला आहे.india bhutan railways पश्चिमेला सिक्कीम, दक्षिणेला पश्चिम बंगाल आणि आसाम आणि पूर्वेला अरुणाचल, उत्तरेला तिबेट आहे. म्हणजेच चीन. भूतानच्या पश्चिमेला संपूर्ण सीमा सिक्कीमशी नाही. ती फक्त 32 किलोमीटर आहे. सिक्कीम आणि भूतानमध्येदेखील तिबेट किंवा चीनचे एक खोरे आहे. त्याला चुम्बी खोरे म्हणतात. भूतान आणि सिक्कीममध्ये खंजिराच्या आकारासारखे हे चुम्बी खोरे आहे. या खंजिराच्या अगदी दक्षिण टोकावर आहे डोकलाम. पहिली रेल्वेलाईन आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेव्हेलफुगपर्यंत बांधली जात आहे. ही सुमारे 70 किलोमीटरची लाईन असेल. त्यावर सहा नवीन स्टेशन्स बांधली जातील. त्यासाठी अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च येईल. कारण त्यासाठी असंख्य पूल बांधावे लागतील. पर्वतांमध्ये रेल्वेमार्ग बांधणे हे मैदानी भागात रेल्वेमार्ग बांधण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. ती अभियांत्रिकीही गुंतागुंतीची असते. त्याची तुलना मैदानी भागातील रेल्वेमार्गाशी करता येत नाही. भूतानला जाणारी रेल्वेलाईन हा केवळ एक प्रकल्प नाही, तर दोन देशांना जोडणारा महाउपयोगी उपक्रम आहे. दुसरी मार्गिका पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्सेपर्यंत धावेल. ती फक्त 20 किलोमीटर आहे; पण हे 20 आणि 70 किलोमीटरचे रेल्वेमार्ग भूतानला भारताच्या 70 हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गांशी जोडतील.
आसाममधील कोक्राझार आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट हे आधीच रेल्वे नेटवर्कचा भाग आहेत. भारत भूतानमध्ये उत्पादित होणाèया गोष्टींपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त वस्तू खरेदी करतो. सध्या सर्व माल ट्रकने येतो. ट्रकना डोंगराळ रस्त्यांवरून जाण्यात अडचणी येतात आणि वाहने अनेकदा त्या रस्त्यांवर अडकतात. चीनने यावर्षी चुम्बी खोèयापर्यंत रेल्वे मार्ग टाकण्यास सुरुवात केली आहे. चीन संपूर्ण तिबेटमध्ये रेल्वेलाईन बांधत आहे. एक उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्याची चुम्बी खोऱ्यातील यातुंगपर्यंत विस्तारण्याची योजना आहे. या पलीकडे भूतानमध्ये असलेला डोकलाम आहे. भारताचा भूतानशी संरक्षणात्मक करार आहे. भूतानचा बचाव हा संरक्षणाचा विषय असल्याने भारतीय सैन्य लढण्यासाठी भूतानच्या बाजूने उतरेल. चीनने डोकलाममध्ये आपले सैन्य पाठवले, तेव्हा भारतीय सैन्य लढण्यासाठी आले. हा फक्त भूतानच्या भूभागाचे रक्षण करण्याचा विषय नाही. या भागाजवळ भारताचा सिलिगुडी कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर एका ठिकाणी फक्त 22 किलोमीटर रुंद आहे. दक्षिणेला त्याच्या खालच्या बाजूला बांगलादेश आहे. म्हणून जवळच्या परिसरात चिनी सैन्याची उपस्थिती भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक असेल. त्या अरुंद कॉरिडॉरद्वारे संपूर्ण प्रदेश भारताच्या उर्वरित भागाशी जोडलेला आहे. म्हणूनच डोकलामवरील चीनचा दावा भूतानसाठीच नाही, तर भारतासाठीही एक मोठे आव्हान आहे. या आणि अशा अनेक आव्हानांना पेलण्यासाठी भारताने आखलेले रेल्वेमार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.