हो आम्ही गोळीबाराची जबाबदारी स्वीकारतो...

कॅनडामध्ये पुन्हा एकदा लॉरेंस बिश्नोई टोळी सक्रिय

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
कॅनडा
Lawrence Bishnoi gang Canada, कॅनडातील सरे आणि आजूबाजूच्या परिसरात पुन्हा एकदा लॉरेंस बिश्नोई टोळीचा धसका बसला आहे. लॉरेंस टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या ‘गोल्डी ढिल्लन’ नावाच्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक पोस्ट टाकत सरे शहरातील तीन वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे. या पोस्टनंतर स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरु केला असून, सुरक्षा यंत्रणाही अधिक सतर्क झाल्या आहेत.
 

Lawrence Bishnoi gang Canada, 
फेसबुकवर ‘गोल्डी ढिल्लन’ या नावाने टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये G76 नावाच्या तीन रेस्टॉरंट्स – 13025 76 Avenue, South Surrey येथील 2160 King George Boulevard आणि Maple Ridge येथील 21768 Lougheed Highway – येथे झालेल्या गोळीबारास आपण जबाबदार असल्याचे लिहिले आहे. या तीनही ठिकाणी काही दिवसांपूर्वी गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या, आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
 
 
या पोस्टमध्ये रेस्टॉरंट मालकांवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, ते आपल्या कर्मचार्‍यांशी आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी दुर्व्यवहार करतात. तसेच, अनेक कामगारांचे वेतन थकवून ठेवण्यात आले असून, या अन्यायाविरोधातच हा 'इशारा' देण्यात आला आहे. पोस्टमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, या रेस्टॉरंट्सपैकी कोणतेही पुन्हा सुरू झाले, किंवा अशाच प्रकारच्या तक्रारी अन्यत्र आल्या, तर संबंधित मालकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
 
 
या पोस्टमध्ये ‘मजूर आणि कष्टकरी लोकांच्या हक्कासाठी हा निर्णय घेतला गेला’ असेही लिहिले असून, ‘Rip Ankit Bhadu Sehrwala, Jitender Gogi Maan Group, Kala Rana, Aarzoo Bishnoi, Sahil Duhan Hisar’ अशा अनेक गँगस्टर्सच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या पोस्टचा संदर्भ कोणत्या टोळीगत संघर्षाशी आहे, याबाबतही तर्क-वितर्क सुरु झाले आहेत.स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरे पोलिस विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित रेस्टॉरंट्सभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्टची पडताळणी केली जात असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही संभाव्य संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे.लॉरेंस बिश्नोई टोळीचा कॅनडातील हा पहिलाच कारनामा नाही. दोन दिवसांपूर्वी या टोळीने कनडामधीलच नवी तेसी नावाच्या व्यक्तीच्या घर, कार्यालय आणि व्यावसायिक संकुलावरही गोळीबार केला होता. त्या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. नवी तेसीवर लॉरेंसच्या नावावर नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. टोळीच्या दाव्यानुसार, तेसीने ५ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ५० लाख रुपये जमा केले होते.
 
 
 
या सगळ्या घटनांमुळे कनडामध्ये भारतीय टोळ्यांमधील वर्चस्ववाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अशा घटना स्थानिक प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. सध्या पोलीस यंत्रणा या टोळीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सायबर क्राईम युनिटमार्फत सोशल मीडिया पोस्ट्सचा शोध घेतला जात आहे.
कॅनडातील वाढत्या टोळीगत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नागरिकांनी दक्ष राहावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती स्थानिक पोलिसांना तात्काळ कळवावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.