मूल,
road accident मूल-मारोडा मार्गावर बल्कीदेव जवळ बुधवारी, 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन वडील-मुलासह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात यश शेंडे व वडील देविदास शेंडे (रा. मारोडा) हे घटनास्थळीच ठार झाले, तर वासुदेव सहारे (रा. भादुर्णा) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
यश शेंडे आणि त्यांचे वडील देविदास शेंडे हे शेतीसंबंधी ऑनलाईन कामासाठी मूल येथे आले होते. काम आटोपून दोघेही दुचाकीवरून परत जात असताना, भादुर्णा येथील वासुदेव सहारे हे मूलच्या दिशेने जात होते. दरम्यान, बल्कीदेव जवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर सहारे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.