मुंबई
Amitabh Bachchan बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठीही देशभरात आदरणीय मानले जातात. सध्या सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या लोकप्रिय रिअॅलिटी गेम शो ‘कौन बनेगा करोडपती १७’ मध्ये त्यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त विशेष एपिसोड प्रसारित करण्यात आला. या एपिसोडमध्ये जे घडलं, त्याने केवळ प्रेक्षकांचेच नव्हे, तर खुद्द बिग बींच्याही डोळ्यांत पाणी आणलं.
या खास भागात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेता-निर्देशक फरहान अख्तर यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आई, स्वर्गीय तेजी बच्चन यांचे एक जुने वक्तव्य दाखवण्यात आले. त्या म्हणाल्या होत्या, “मी खूप भाग्यशाली आहे. आता मी जिथेही जाते, लोक मला माझ्या मुलामुळे प्रेम आणि सन्मान देतात. एका आईसाठी याहून मोठं भाग्य काय असू शकतं?” आईच्या या भावना ऐकताच अमिताभ भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
या क्षणाने संपूर्ण स्टुडिओमध्ये भावनांचा एक जिवंत वातावरण तयार झाला. शोच्या निर्मात्यांनी हा टीझर सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना १० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ‘सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन’ आणि ‘सोनी लिव्ह’वर हा भाग पाहण्याचं आमंत्रण दिलं.
एपिसोडमध्ये पुढे अमिताभ यांनी २००४ मध्ये आलेल्या 'लक्ष्य' या चित्रपटातील अनुभव शेअर केला. फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “त्या वेळी फरहान रात्री माझ्या खोलीत आला आणि विचारलं, ‘अमिताभ अंकल, काही त्रास तर नाही ना?’ आम्हाला वाटलं की, हा तर उस्ताद आहे – आम्हाला शिकवतोय की अभिनय कसा करायचा.”शोदरम्यान, एक गंमतीदार प्रसंगही घडला. जेव्हा फरहानने दोघांनाही विचारलं की, “तुमच्यापैकी महिलांमध्ये कोण अधिक लोकप्रिय आहे?” त्यावर अमिताभ यांनी लगेच जावेद अख्तर यांच्याकडे बोट दाखवलं. त्यावर जावेद साहब म्हणाले, “हे काय प्रश्न आहे? हे विचारायची गोष्ट आहे का?” आणि त्यांनी अमिताभ यांना हसत हसत सांगितलं, “सगळं उघड करू नकोस.”या विशेष भागाने प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही, तर भावना आणि स्नेहानेही भारावून टाकलं. वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसारित झालेला हा कार्यक्रम अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या क्षणाची साक्ष ठरला. त्यांचं आईवरचं प्रेम, कृतज्ञता आणि नम्रता याचा प्रत्यय या क्षणातून पुन्हा एकदा दिसून आला.