पतीच्या अंगावर टाकले उकळत तेल, तिखट आणि धमकी!

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Boiling oil poured on husband's body दक्षिण दिल्लीतील मदनगीर परिसरातून एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. २८ वर्षीय दिनेश नावाच्या तरुणावर त्याच्याच पत्नीने झोपेत असताना उकळते तेल आणि तिखट पूड ओतून निर्दयपणे हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दिनेश गंभीररीत्या भाजला असून, सध्या तो सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑक्टोबरच्या पहाटेची आहे. औषध कंपनीत काम करणारा दिनेश रात्री कामावरून घरी आला, जेवण करून झोपला.
 
 
Boiling oil poured on husband
 
 
पहाटे सुमारे तीनच्या सुमारास झोपेत असतानाच त्याच्या अंगावर उकळते तेल ओतण्यात आले. वेदनांनी तडफडत असतानाच पत्नी साधनाने त्याच्या भाजलेल्या जखमांवर तिखट पूड फासली. तीव्र जळजळ आणि वेदनेने दिनेश ओरडू लागला, पण पत्नीने धमकी दिली, जर आवाज केला तर अजून गरम तेल ओतेन. त्यावेळी त्यांच्या घरात आठ वर्षांची मुलगीही होती. शेजाऱ्यांनी सांगितले की, दिनेशच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून ते ताबडतोब वर धावले, पण पत्नीने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. बराच वेळ दरवाजा उघडण्यास ती तयार नव्हती. शेवटी दरवाजा उघडल्यावर दिनेश गंभीर भाजलेल्या अवस्थेत सापडला, तर आरोपी पत्नी घरातच लपलेली होती.
 
 
शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेण्यास नकार देऊन स्वतः ऑटो बोलावून दिनेशला रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला तत्काळ सफदरजंग रुग्णालयात हलवलं. वैद्यकीय अहवालानुसार, त्याच्या शरीराच्या सुमारे २० टक्के भागावर खोल भाजल्या गेल्या आहेत. दिनेश आणि साधना यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. दोन वर्षांपूर्वी पत्नीने क्राइम अगेंस्ट वुमन सेलमध्येही तक्रार दिली होती, परंतु समुपदेशनानंतर प्रकरण मिटल्याचं सांगितलं जातं. मात्र, या घटनेच्या आधीही दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी साधना विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११८ (जाणीवपूर्वक दुखापत), १२४ (धमकी) आणि ३२६ (गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपी पत्नी फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. या भयावह घटनेने मदनगीर परिसरात तसेच दक्षिण दिल्लीभरात एकच खळबळ उडाली आहे.