नागपूर,
egg bhurji world record महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, भारतीय कुक्कुट विज्ञान संघटना आणि राष्ट्रीय अंडी समन्वय समिती यांच्या सहकार्याने, ५००१ अंडी वापरून "अंडा भुर्जी" तयार करण्याचा एक जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भव्य कुकिंग कार्यक्रमाचे नेतृत्व सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर करतील.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:०० वाजता नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आला असून जनतेसाठी खुला आहे. या भव्य उत्सवाचे साक्षीदार म्हणून प्राध्यापक, विद्यार्थी, पाहुणे, मान्यवर, स्थानिक प्रशासक आणि नागरिकांसह अंदाजे ३,५०० लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. माफसू अंतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या कुक्कुट पालन शास्त्र विभागाच्या पुढाकाराने, या ऐतिहासिक पाककृती कार्यक्रमासह जागतिक अंडी दिन साजरा करण्यात येत आहे. माफसूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विक्रमी पाककृती नंतर उपस्थितांना ताजी "आमची भुर्जी पावासोबत चाखण्याची आनंददायी संधी मिळेल.
या कार्यक्रमाचा उद्देश केवळ जागतिक विक्रम प्रस्थापित करणे नाही तर अंड्यांच्या पौष्टिक मूल्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि परवडणारे प्रथिनेयुक्त अन्न म्हणून लोकांमध्ये त्याचा वापर वाढवणे हा आहे. या अनोख्या उपक्रमाला माफसू चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, नागपूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, नागपूर मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महा मेट्रो नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह माफसुचे सर्व अधिष्ठाता व पदाधिकारी उपस्थित राहतील. तरी जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.