गाझीपूर,
Fish coming out of the water pump उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील जनसडा गावात सतत पडणाऱ्या पावसामुळे एका अनोख्या घटनेने गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मागील दोन दिवसांपासून गावातील सुमारे २० ते २५ घरांच्या ट्यूबवेल आणि हँडपंपातून पाणी ऐवजी छोटे मासे बाहेर येत आहेत. स्थानिक रहिवासी नंदू कुशवाह यांनी सांगितले की, त्यांच्या २५-३० वर्ष जुन्या ट्यूबवेलमधून ५ ऑक्टोबरला सुमारे १.२५ किलो मासे बाहेर आले. इतर अनेक गावकऱ्यांनीही पंपातून मासे बाहेर पडल्याचे बकेटमध्ये पाहिले आहे.
तज्ज्ञांच्या मते, सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीखालील पाणीस्तरावर दाब वाढल्यामुळे मासे त्यांच्या नैसर्गिक जलाशयातून पंपमार्गे वर येत आहेत. या विचित्र घटनेमुळे ट्यूबवेलचे पाणी पिवळसर व वासाळलेले झाले असून, गावकऱ्यांना स्वयंपाक आणि पिण्यासाठी आरओ पाणी खरेदी करावे लागते. हँडपंपमधून मासोळ्या निघत असल्याची बातमी पसरताच, शेजारी गावांतील लोकही या अद्भुत दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी जनसडा येथे जमत आहेत.