सिरोंचा,
teak smuggling सिरोंचा तालुक्यातील चिंतलपल्ली येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर 1 ऑक्टोबर 2025 रोजी उघडकीस आलेल्या सागवान तस्करी प्रकरणात वनकर्मचार्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात वनरक्षक जितेंद्र धर्मराव मडावी यांना निलंबित करण्यात आले असून, आणखी काही कर्मचार्यांचा या साखळीत सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.
चिंतलपल्ली वनउपज तपासणी नाक्यावर अवैधरित्या सागवान माल वाहतूक करत असलेले वाहन (क्र. 58-3415484) पकडण्यात आले. या वाहनातून 0.435 घनमीटर सागवानी लाकूड (5 लठ्ठे) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 51 हजार 335 रुपये आहे. वनकर्मचार्यांनी घटनास्थळीच आरोपी संदीप दामोधर मडावी (34) रा. कन्हाळगाव, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्याच्याकडून स्वराज ट्रॅक्टर, 2 चेनसो कटिंग मशीन व 10 फूट लोखंडी संकल जप्त करण्यात आले.
चौकशीत आरोपीने कबुल केले की, तो अवैध सागवान महादेवपूर (तेलंगणा) येथील सुधाकर दशरथ चिर्लावंचा याला विक्रीसाठी नेत होता. याच चौकशीत त्याने वनविकास महामंडळातील कर्मचारी वनरक्षक जितेंद्र धर्मराव मडावी यांचा थेट सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार मडावी यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा सागवान वनविकास महामंडळाच्या नियतक्षेत्र कोप्पेला येथील खंड क्रमांक 233 मधून अवैधरित्या तोडण्यात आल्याचे उघड झाले. आरोपीने तपास अधिकार्यांना मौक्यावर जाऊन तोड झालेली झाडे व थुट दाखवली. या प्रकरणात आणखी काही कर्मचारी सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.teak smuggling वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास क्षेत्र सहाय्यक एस. एस. निलम यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सिरोंचा वनक्षेत्र पुन्हा एकदा ‘पुष्पा शैली’च्या सागवान तस्करीने हादरले आहे. काही काळ वनविभागाने कठोर कारवाई करत या तस्करीवर आळा घातला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या तस्करीचे जाळे तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात पसरले आहे.