गांधींवर श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर व बुद्धांंचा प्रभाव : पं. अग्निहोत्री

वर्धेत महात्मा गांधी विचार संमेलन व महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार वितरण

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
वर्धा,
gandhi philosophy महात्मा गांधी यांच्या विचारांवर श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर व बुद्ध यांच्या तत्त्वांचा प्रभाव होता, असे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. बुधवार ८ रोजी शिवशंकर सभागृह अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस येथे एकता सेवा भावी संस्था महाराष्ट्र द्वारा आयोजित २९ व्या वर्धापन दिनानिमित्त व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधी विचार संमेलन व महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार-२०२५ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री गितांजली कुलकर्णी, राजयोगिनी माधुरी दीदी, सुरेश हिवराळे, स्वागताध्यक्ष अनिल नरेडी, निमंत्रक संदीप चिचाटे, निमंत्रक प्रा. अरुण पडघन व संयोजक अजमत खान यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 

gandhi philosophy 
ते पुढे म्हणाले की, गांधीजींच्या रामराज्याची कल्पना मर्यादा, न्याय, समानता आणि लोकशाहीवर आधारित होती. त्यांच्या विचारात रामराज्य म्हणजे सर्वसाधारणांसाठी काम करणारी लोकशाही व सर्वांच्या कल्याणासाठी समर्पित व्यवस्था होती. गांधीजींना भगवद्गितेतून कर्तव्याचा बोध मिळाला अहिंसा, सत्य, कर्मयोग आणि आत्मनियंत्रण या मूल्यांची त्यांनी स्विकारलेली जीवनशैली होती. श्रीकृष्णाच्या उपदेशाने जीवनातील संघर्ष, मार्गदर्शन आणि धैर्याची प्रेरणा मिळाली होती म्हणूनच गांधीजींनी गीता माझे मानसिक भोजन आहे, असे म्हणून गीतेचे वाचन रोज होते, असे त्यांनी सांगितले.
गांधीजींवर बुद्धांच्या अहिंसा या तत्त्वाचा प्रभाव होता. अहिंसा हे केवळ हिंसा टाळण्याचे तत्त्व मानले नव्हते तर त्यांच्या मते अहिंसा म्हणजे आपल्या विचार, शब्द आणि कृतीमध्ये कोणताही अपकार न करणे व सर्व प्राण्यांप्रती प्रेम आणि करुणा ठेवणे. महावीरांनी जैन धर्माच्या पंचशील तत्त्वांमध्ये अहिंसा व सत्याचा विशेष महिमा सांगितला आहे. गांधीजींवर या तत्त्वांचा प्रभाव होता. त्यांनी स्वत:च्या मन, वचन आणि कृतीमध्ये सत्य आणि अहिंसा पाळत देशाला आणि जगाला नवे मार्गदर्शन दिले. गांधीजींच्या सत्याग्रह या संकल्पनेला देखील महावीरांचे विचार मूळ प्रेरणा ठरले असल्याचे अग्निहोत्री म्हणाले.
 
 
यावेळी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी व माधुरी दीदी यांनी गांधी विचारांची महती विशद करीत गांधी विचार हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही काळाची गरज आहे असे म्हटले.संचालन संदीप चिचाटे यांनी तर प्रास्ताविक अजमत खान यांनी केले.