गोंदिया,
paddy विविध कारणाने नेहमी चर्चेत राहणारी शासकीय धान खरेदीची भरडाई मुदतीत पूर्ण होणार आहे. धान भरडाईला ३१ ऑक्टोबरची मुदत असून आतापर्यंत खरीप हंगामातील ९८.२० तर रब्बी हंगामातील ६१.२२ टक्के धान भरडाई झाली आहे. मुदतीत गोदामातील धानाची उचल होणार असल्याने येत्या पणन हंगामातील धान खरेदी वेळेत सुरू होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात केंद्र शासनाच्या हमी भाव योजनेअंतर्गत जिल्हा पणन कार्यालयाच्या उपअभिकर्ता संस्थांद्वारे धान खरेदी केले जाते. खरेदीतील सावळागोंधळ व गैरप्रकारामुळे शासकीय धान खरेदी दर हंगामात चर्चेत राहते. धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया आभासी आहे. यामुळे बहुतांशी या प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे. जिल्हा पणन कार्यालयाअंतर्गत संस्थांनी गत खरीप हंगामात २४६७५३१ क्विंटल तर रब्बी हंगामात २५१३३४४ क्विंटल धान खरेदी केले. धान भरडाईसाठी जिल्ह्यातील ३२६ मिलमालकांनी करारनामे केले होते. पैकी २७३ मिलमालकांकडून धान भरडाई केली जात आहे. आतापर्यंत खरीपातील २४६४११५ क्विंटल तर रब्बीतील २०८९४९९ क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल झाली आहे. खरीपातील ९८.२० टक्के धानाची भरडाई पूर्ण झाली आहे तर रब्बीतील ६१.२२ टक्के भरडाई पूर्ण झाली आहे. ६७ टक्के प्रमाणे खरीपातील १६२३४१८ क्विंटल व रब्बीतील १०३०८९९ क्विंटल तांदूळ शासन जमा (जिल्हा पुरवठा विभाग) करण्यात आला आहे. २०२३-२४ हंगामात मिलमालकांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धान भरडाई न करण्याचा पावित्रा घेतल्याने भरडाई रेंगाळली होती. यंदा मात्र तसे नाही. ३१ ऑक्टोबर या मुदतीत धान भरडाई पूर्ण होणार असल्याने २०२५-२६ हंगामातील धान खरेदीसाठी गोदाम उपलब्ध होऊ शकतील. यामुळे चालू हंगामातील धान खरेदी वेळेत सुरू होईल अशी अपेक्षा बाळगू या.